खडसेंचा भाजपला रामराम

शुक्रवारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : पक्षावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी अखेर भाजप पक्षाला रामराम ठोकला आहे. खडसे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तीन दशके भाजपमध्ये काम करून भाजपला बळ दिलं. त्यांनी त्यांचा पक्ष सोडलेला आहे असं मला सांगितलं. शुक्रवारी 2 वाजता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

एकनाथ खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीचे बळ वाढेल. भाजपमध्ये होणारा अन्याय अनेक लोकांनी पाहिला आहे. हळूहळू आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होईल. खडसेंबरोबर येण्याची अनेकांची इच्छा आहे. आम्ही त्यांना टप्पाटप्प्याने प्रवेश देणार आहोत. असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील म्हणाले की, शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. एकनाथ खडसे यांनी आज सकाळी पक्षाचा राजीनामा दिला अशी माहिती मिळाली. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना खडसे यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली, असंही पाटील यांनी नमूद केलं.

भाजप नेत्यांची प्रतिक्रिया

रावसाहेब दानवे : एकनाथ खडसे यांचा पक्षांतराचा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. एकनाथ खडसेंचा निर्णय पक्षापेक्षा त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे. नाथाभाऊंनी भाजप सोडायला नको होता. खडसेंची समजूत काढण्यात पक्ष कुठेही कमी पडलेला नाही. दिल्या घरी सुखी राहा, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.


देवेंद्र फडणवीस : अधिकृत माहिती मिळालेली नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.