स्थानिक ठेकेदारांना डावलले तर आंदोलन

आ. मंदाताई म्हात्रे यांचा पालिकेला इशारा

नवी मुंबई : सध्या दैनंदिन साफसफाईच्या ठेकेदारीवरून वाद सुरु असून स्थानिक राजकर्त्यांनी यात उडी घेतली आहे. पालिकेच्या उद्यान विभागाची कामे रद्द करून सदरच्या कामांचे कंत्राट स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना देणेबाबत तसेच साफसफाईच्या 96 कामांचे देण्यात येणारे कंत्राटही जुन्या स्थानिक प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांना देण्याबाबत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. भूमीपुत्रांना या कामांमध्ये पुन्हा डावलण्यात आले तर यापुढे कोणाचीही हयगय केली जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सदरची दोन्ही कंत्राटे ही स्थानिक प्रकल्पग्रस्तांना देण्याबाबत प्रथम प्राधान्य असेल असे स्पष्ट केले.

नवी मुंबई शहर विकसित करण्यासाठी येथील स्थानिक भूमिपुत्रांनी त्यांची 100% जमीन दिली आहे. नवी मुंबई शहराच्या विकासामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा खूप मोठा हात असताना त्यांनाच डावलून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम महापालिका प्रशासन करीत असल्याचा आरोप आ. म्हात्रे यांनी केला आहे. यासंदर्भात आ. मंदा म्हात्रे यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची बुधवारी भेट घेतली. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार पाहता सदर ठेकेदाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचे लायसन्स जप्त करण्याची मागणीही यावेळी आ. म्हात्रे यांनी यावेळी केली. नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलण्याचे काम जर महापालिका प्रशासन करीत असेल तर यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही. महापालिकेला मिळालेले स्वच्छतेचे पुरस्कार हे प्रकल्पग्रस्तांमुळेच मिळालेले असूनही त्यांना नामशेष करण्याचा डाव महापालिका आखत आहे. परंतु हे कदापि सहन करणार नसून नवी मुंबईवर पहिला हक्क हा स्थानिक भूमीपुत्रांचा असल्याने जर त्यांना कामांमध्ये पुन्हा डावलण्यात आले तर यापुढे कोणाचीही हयगय केली जाणार नाही असे म्हणत आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडले जाणार असल्याचेही आ. म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सदरची दोन्ही कंत्राटे ही स्थानिक प्रकल्पग्रस्तांना देण्याबाबत प्रथम प्राधान्य असेल असे स्पष्ट केले. उद्यान विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी समिती नेमली असून लवकरच सदरबाबत अहवाल सादर करणार असल्याचे सांगत दोषी कंत्राटदार व संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे संकेतही आयुक्तांनी दिले.