अज्ञात टोळीने तरुणीकडून उकळले 14 लाख

नवी मुंबई : लग्न जुळविण्याच्या साईटवर स्वत:साठी वर शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या कळंबोलीतील एका 30 वर्षीय तरुणीकडून अज्ञात टोळीने तब्बल 14 लाख रुपयांची रक्कम उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या टोळी विरोधात फसवणुकीसह विश्‍वासघात केल्याप्रकणी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.      

या प्रकरणातील तक्रारदार तरुणी कळंबोलीत आई-वडील व बहिणींसह रहाण्यास असून या तरुणीने गत ऑगस्ट महिन्यामध्ये लग्न जुळविणार्‍या एका साईटवर स्वत:साठी वर शोधण्यासाठी नोंदणी केली होती. त्यानंतर काही दिवसातच अज्ञात भामटयाने डॉ.कबीर आनंद नावाने या तरुणीला रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी ओळख वाढविली होती. तसेच या तरुणीशी व्हॉट्सॅपवरुन चॅटींग करुन तिच्याशी मैत्री वाढविली. त्यांनतर भामटया डॉ.कबीर आनंद याने, तो स्पेन येथे रहाण्यास असल्याचे तसेच तो तेथील युनिसेफमध्ये नोकरी करत असल्याचे तरुणीला सांगितले होते. कबीर याने ऑक्टोबर अखेर लग्न करण्याचे तरुणीला आश्‍वासन देऊन आजीच्या इच्छेमुळे तो भारतात स्थायिक होणार असल्याचे तिला सांगुन तिचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर गत 30 सप्टेंबर रोजी त्याने या तरुणीला व्हॉट्सऍप कॉल करुन तो एक करोड युरोची रक्कम घेऊन दिल्ली एअरपोर्ट येथे आला असताना, कस्टमच्या अधिकार्‍यांनी त्याला 1 कोरड युरोसह पकडल्याची थाप मारली. तसेच बेकायदेशीरपणे युरोची इतकी मोठी रक्कम आणल्याने सदर रक्कमेवर कस्टम विभागाकडून टॅक्स भरण्यास सांगण्यात येत असल्याचे तरुणीला सांगितले. यावेळी कस्टम विभागातील महिला अधिकारी असल्याचे भासवून सदर टोळीतील महिलेने या तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधुन डॉ.कबीर याला सोडण्यासाठी 32 हजार रुपये भरण्यास तरुणीला सांगितले.  

त्यानुसार या तरुणीने सदरची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केल्यानंतर पुन्हा सदर टोळीतील महिलेने या तरुणीला आणखी टॅक्स व कस्टम डयुटी भरावी लागले असे सांगून तिला प्रथम 75 हजार व त्यानंतर 1 लाख 28 हजार तसेच त्यानंतर 48 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. यादरम्यान, कबीर हा तरुणीला व्हॉट्सऍप कॉल करुन तिच्यापुढे रडण्याचे नाटक करत असल्याने भावनिक झालेल्या या तरुणीने, तिला ज्या पद्धतीने सांगतिले जाते, त्यानुसार ती पैसे पाठवत गेली. अशा पद्धतीने या तरुणीने 18 दिवसांमध्ये सदर टोळीला तब्बल 14 लाख रुपये पाठवून दिल्यानंतर देखील सदर टोळीकडून आणखी पैशांची मागण्यात करण्यात येऊ लागल्यानंतर या तरुणीने आपल्या मैत्रिणीला ही बाब सांगितली. त्यानंतर तिची फसवणुक होत असल्याचे मैत्रीणीने तिला सांगितल्यानंतर या तरुणीने कळंबोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.