कमळाची साथ सोडताच खडसेंचा ‘गजर’ सुरु

कुणी किती भूखंड घेतले ते दाखवतो ; त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन

मुंबई ः मुंबई ः भाजपाला रामराम ठोकुन एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. कमळाची साथ सोडून घड्याळासोबत चालण्याचा निर्णय घेतलेल्या खडसेंनी पक्षप्रवेश करताच भाजपविरोधी ‘गजर’ सुरु केला आहे. 

एकनाथ खडसे यांनी गेल्या 40 वर्षांपासून भाजप पक्षासाठी मोठं काम केलं आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलंलं जात होतं. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.

भाजपला रामराम ठोकल्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले की, भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यावा लागला. मला बर्‍याच पक्षांकडून ऑफर होती. पण, कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला हवं. दिल्लीतल्या वरिष्ठांनीही राष्ट्रवादीमध्ये जा म्हणून सांगितलं. माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भूखंड घेतल्याचा आरोप करण्यात आला. पण काही दिवस जाऊ द्या, कुणी किती भूखंड घेतले ते मी तुम्हाला सांगतो. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण केलं. माझा परिवाराला यामुळं मनस्ताप झाला. मंत्री असताना माझ्यावर नऊ महिने पाळत ठेवली. मला काही मिळालं किंवा नाही मिळालं याचं दुख नाही, मी माझ्या ताकतीनं ते मिळवलं. मी 40 वर्ष राजकारण केले पण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही असेही ते म्हणाले. तसेच तुम्ही भाजपविरोधात बंड पुकारलंत तर तुमच्या मागे ईडीची ची वगैरे कारवाई लावतील, असं पाटील म्हणाले होते. पण त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपला नाव न घेता टोला हाणला. त्याबरोबर राष्ट्रवादीबरोबर दुपट्टीने काम करणार असून जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शरद पवार यांनीही एकनाथ खडसे यांचे स्वागत केले असून खडसेंचा अनुभव पक्षासाठी मोलाचा ठरेल असे सांगून संघटनेची शक्ती वाढते याचे समाधान व्यक्त केले. खान्देशात आपली ताकद वाढवणे गरजेचे असून खडसेंमुळे आता जळगाव पुन्हा राष्ट्रवादी होणार असेही पवार म्हणाले. तसेच खडसेंना प्रवेश दिल्याने मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नसून सगळे जिथे आहेत तिथेच राहतील असेही पवार यांनी स्पष्ट केले. 

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी  काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार  सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.