कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या प्रयत्नांना मोठे यश

नवी मुंबई : महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना तत्कालीन आयुक्त मिसाळ यांची बदली करण्याचा धाडसी निर्णय राज्य सरकारने घेतला. महामारीच्या काळात घेतलेल्या या निर्णयावर बरीच टीका त्यावेळी झाली परंतु नवीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी योजलेल्या परिणामकारक उपायांमुळे नवी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संखेत दिवसेंदिवस  कमालीची घट होत आहे. परंतु नागरिकांनी अजूनही सतर्कता बाळगण्याचे आवाहन आयुक्तांनी नवी मुंबईकरांना केले आहे.

नवी मुंबईत 13 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तत्कालीन पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी अलगीकरण आणि विलगीकरण केंद्रे उभारली. पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुगणालयात केले. बेडची कमतरता भासु नये म्हणून 1200 खाटांचे विलीगीकरणासह 400ऑक्सिजन  खाटांचे सेंटर वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात सुरु केले. पालिकेने शहराची लोकसंख्या पाहता 13 कोविड सेंटर्स, 4 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स व 2 डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटल्स उभारली आहेत.  परंतु एवढे प्रयत्न करूनही म्हणावे तसे यश न आल्याने राज्य सरकारने अखेर ताज्या दमाच्या अभिजित बांगर यांची नियुक्ती पालिका आयुक्त म्हणून केली. 

आयुक्त अभिजित बांगर यांनी थेट नागरिकांपर्यंत पोहोचत विविध उपक्रम सुरू केले आहेत. अँटिजेन टेस्ट शिबिरांमुळे प्राथमिक लक्षणे असतानाच रुग्णांना शोधून काढत त्यांच्यावर उपचार सुरु केले. तसेच एखादा पॉझिटिव्ह रुग्ण सापडताच केंद्र शासनाच्या आदेशानुसार क्लस्टर पॉलिसी राबवत पॉझिटिव्ह रुग्णाच्या शेजारील 30 घरांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे संसर्ग वाढीस आळा बसला आहे. अनेक रुग्णांवर घरीच उपचार केले. या प्रयत्नांमुळे नवी मुंबईचा रिकव्हरी रेट 92 टक्के झाला असून रुग्ण दुपाटीचा कालावधी 127 दिवसांवर पोहोचला आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्याने अनेक कोव्हीड सेंटर्समधील प्रवेश कमी झाले आहेत. दिवसाला 500 च्या वर सापडणार्‍या रुग्णांची संख्या निम्म्यावर आली आहे. त्यामुळे आपोआप काही सेंटर्समध्ये तर 5 पेक्षा कमी प्रवेश होऊ लागले आहेत. त्यामुळे पालिकेने 13 पैकी 8 कोविड केअर सेंटर्सचे प्रवेश तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला असून, यापूढे पॉझिटिव्ह येणार्‍या रुग्णांना मुख्य ऑक्सिजन बेड असणार्‍या तीन सेंटर्समध्ये विभागणी करून ठेवण्यात येणार आहे.

यामुळे शहरातील तीन मोठ्या सेंटर्समध्ये पुरुष, महिला व आईसह लहान मुलांना व कुटुंबाला राधास्वामी सत्संग हॉल, सिडको प्रदर्शन केंद्र व निर्यात भवन येथे ठेवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. नवी मुंबईचे कोरोनामुक्तीच्या दिशेने आणखीन एक सकारात्मक पाऊल पडतानाचे चिन्ह दिसून येत आहे. या निर्णयाने नवी मुंबईकरांना दिलासाच मिळाला आहे.

प्रवेश सुरू राहणारी कोविड केअर सेंटर्स
 सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी- महिला व पुरुष सौम्य, अति सौम्य व मध्यम लक्षणे असलेले.  राधास्वामी सत्संग हॉल, तुर्भे- महिला व पुरुष सौम्य, अति सौम्य व मध्यम लक्षणे असलेले  निर्यात भवन, तुर्भे,  एमजीएम सानपाडा कोविड सेंटर- महिला, लहान बाळे किंवा कुटुंब