Breaking News
समाजकल्याण विभागाचा निर्णय; सहकार्य करण्याचे आवाहन
नवी मुंबई : तृथीयपंथीय लोकांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्याच्या दृष्टिने सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरु असून त्यासाठी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून तृथीयपंथीयांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वेक्षणास तृतीय पंथीय व्यक्ती व संस्थानी सहकार्य करावे असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.
राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे या हेतूने, विभागीय तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबतचा मुद्दा तिसर्या महिला धोरणामध्ये समाविष्ठ करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने राज्यातील तृतीय पंथीयांच्या मुलभूत अधिकारांचे संरक्षण करणे व त्यांच्या आर्थिक व सांस्कृतिक विकासाच्या योजना राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय व विभागीय स्तरावर तृतीय पंधीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार समाजकल्याण विभागाच्या मुंबई विभागीय प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी त्यांनी मंगळवारी कोकण भवन येथील कार्यालयात क्षेत्रीय अधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत किन्नरमा सेवा संस्थेच्या सचिव अनिता वाडेकर, अखिल किन्नर सेवा समितीच्या सोनाली चोकेकर, प्रिया पाटील तसेच मुंबई विभागातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्हयातील सहाय्यक आयुक्त सहभागी झाले होते. सदर बैठकीत तृतीय पंथीय वर्गाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी तृतीयपंथीय संघटनेच्या पदाधिकार्यांनी तृतीयपंथीय लोकांना रेशनकार्ड, आधारकार्ड काढण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी तृतीयपंथीयासाठी घरकुल सारखी एखादी योजना असावी, तसेच कोव्हीड काळामध्ये तृतीयपंथीयावर आर्थिक संकट कोसळल्यामुळे त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली.
यावर उपायुक्त वंदना कोचुरे यांनी तृथीयपंथीयांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले तसेच मुंबई विभागातील तृतीय पंथीय लोकाचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या. त्यानुसार तृथीयपंथीय संस्थेचे 2 प्रतिनिधी व समाजकल्याण विभागाच्या त्या त्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून मुंबई विभागातील तृथीयपंथीयांचे जिल्हास्तरीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. येत्या 2 महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध डेटा एकत्र करून तृथीयपंथीयांना मदत देण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी दिली. तृतीय पंथीय लोकांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी मुंबई विभागात तृतीय पंथीय लोकांची संख्या किती आहे ते समजणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मुंबई विभागातील तृथीयपंथीयांनी समाजकल्याण विभागाच्या संबंधित सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचे तसेच या सर्वेक्षणास तृतीय पंथीय व्यक्ती व संस्थानी सहकार्य करावे असे आवाहन कोचुरे यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai