यंदा सोनेखरेदी मंदावली

नवी मुंबई ः साडेतीन मुहुर्तांपैकी एक समजल्या जाणार्‍या दसर्‍याचा मुहुर्त साधून सोनेखरेदी केली जाते. मात्र यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व मंदी यामुळे रायगड, नवी मुंबईसह मुंबईतही दसर्‍याला सोने खरेदी घसरल्याचे पाहायला मिळाली. 

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहुर्त असे दसर्‍याचे महत्त्व आहे. या मुहुर्तावर सोनेखरदीला नागरिक प्राधान्य देतात. दसर्‍यापासून शुभकार्याचे मुहुर्त सुरू होतात. त्यामुळे लग्नसराईचा मोसम सुरू होण्याआधरीचा सण असल्याने,  सोनेखरेदीला ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा सराफा व्यावसायिकांना होती. मात्र, वाढती महागाई आणि तिच्या जोडीला जाणवत असलेला आर्थिक मंदीचा प्रभाव यंदाच्या सोनेखरेदीवरही होता. काही सराफांनी तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कल्पना लढवल्या होत्या. मात्र, तरीही सोनखरेदीला म्हणावी तेवढी चालना मिळाली नसल्याचे काही सराफांनी सांगितले. दसर्‍याला सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, सणाला यंदा आर्थिक मंदीचा फेरा जाणवत आहे, त्यातच दोन वर्षांपूर्वी झालेल्या नोटाबंदीमुळे अजूनही मंदी असल्याने अनेकांना सोनेखरेदीची इच्छा असूनही सोनेखरेदी करता आले नाही. काही ग्राहकांनी केवळ  मुहुर्ताचीच खरेदी केली. मागील वर्षी दसर्‍याला सोन्याचा भाव 38 हजार होता. यंदा सोने 52 हजारांवर गेले आहे. कोरोनाने आधीच सगळ्यांना फटका बसला आहे. त्यात सोन्याचे वाढत असल्याने यंदा सोनेखरेदी मंदावल्याचे चित्र सराफ बाजारात होते.