वाशी टोलनाक्याजवळ वाहतुक कोंडी

नवी मुंबई ः वाशी टोलनाक्याजवळ आज सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. टोलनाका ते सेक्टर 17 जवळील उड्डाणपुलांपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या कोंडीमुळे मुंबईकडे जाणार्‍या चाकरमान्यांना सकाळी सकाळीच मनस्ताप सहन करावा लागला. ‘फास्टॅग’ प्रणालीचा अवलंब वाहन चालकांनी केला तर टोलनाक्यावर लागणार्‍या वाहनांच्या रांगा कमी होण्यास मदत होईल. शिवाय पारदर्शक व्यवहार व वेळेत बचत होण्यास मदत होईल. 

वाशी टोलनाक्यावर मुंबईकडे जाणार्‍या मार्गावरच सकाळी नऊच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी हा प्रकार घडल्यानं शेकडो लोक कोंडीत अडकले होते. मुंबईकडे जाण्यासाठी या मार्गाशिवाय अन्य मार्ग नसल्याने अनेकांना कारमध्ये बसून वाहतूक कोंडी दूर होण्याची वाट पहावी लागली.  

डिसेंबर 2017 पासून नव्याने खरेदी केलेल्या वाहनांच्या नोंदणीसाठी ‘फास्टॅग’ बंधनकारक केले. त्यानंतर टोल नाक्यावर रोख स्वरूपात पैशांची देवाण-घेवाण करताना वाहनांच्या लागणार्‍या रांगा कमी करण्यासाठी टोल नाक्यावर ‘फास्टॅग’ बंधनकारक करण्यात आले. ‘फास्टॅग’ नसणार्‍या वाहनांसाठी टोलनाक्यांवर एक मार्गिका राखीव ठेवण्यात येते. ‘फास्टॅग’ मुळे टोलनाक्यावर कुठल्याही प्रकारे रोख पैसे न देता वाहने पुढे नेता येतात. यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन (आरएफआयडी) लावले जाते. वाहन टोल नाक्याच्याजवळ पोहोचल्यानंतर तेथील सेन्सर कारच्या काचेवर लावलेला फास्टॅग स्टिकर ओळखतो व संबंधित चालकाच्या/मालकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कापली जाते. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता तर राहतेच शिवाय टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी फास्टॅग लावले तर टोलनाक्यावर वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.