कोविड रुग्णालय लवकर सुरु करावे

प्रकल्पग्रस्त समिती आणि महापालिका आयुक्त यांची बैठक

पनवेल : पनवेलसाठी उभारण्यात येणार असलेल्या कोविड रुगणालयाच्या कामकाजाचा पाठपुरावा करण्यासाठी मंगळवारी पनवेल-उरण प्रकल्पग्रस्त समिती यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेतली. सिडकोच्या माध्यमातून व महापालिकेच्या सहकार्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या कळंबोली येथील नविन रुग्णालयाचे कामकाज लवकर सुरू व्हावे व त्याचसोबत पनवेल महानगरपालिकेसाठी 4 नव्या ंरुग्णवाहिका महापालिकेने विकत घ्याव्यात अशी मागणी प्रकल्पग्रस्त समितीकडून करण्यात आली.

यावेळी महापालिकेमार्फत सर्व आवश्यक गोष्टींची चाचपणी सुरू असून लवकरच सर्व अद्ययावत सुविधांसह इस्पितळ सुरू करण्यात येईल असे आश्‍वासन महापालिका आयुक्तांनी प्रकल्पग्रस्त समितीला दिले. त्याचसोबत रुग्णवाहिकेबाबतही राज्यशासनाशी चर्चा चालू असून येत्या काही दिवसात रुग्णवाहिका पनवेलकरांच्या सेवेत हजर होतील अशी खात्री आयुक्तांनी दिली. यावेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सामाविष्ट करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या घरपट्टीचा प्रश्‍नही प्रकल्पग्रस्त समितीतर्फे मांडण्यात आला. त्यावरही विचारविनिमय करून योग्य निर्णय रहिवाश्यांच्या हिताचा घेण्यात येईल अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.