प्रथम संदर्भ रुग्णालयात तोडफोड

रुग्ण दगावल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा उद्रेक

नवी मुंबई ः वाशीतील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात मंगळवारी मध्यरात्री रुग्ण दगावल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी तोडफोड केली. रुग्णालयाचे दरवाजे, मशिन्स, ऑक्सिजन सिलेंडर यांची नासधूस करण्यात आली. तसेच डॉक्टर, वॉर्डबॉय, नर्सेस यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ मारहाण सुद्धा केली. या तोडफोडीप्रकरणी महापालिकेने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीसानी काहींजणांना ताब्यात घेतले आहे.

जुहुगाव येथील 48 वर्षाचे गृहस्थ खाजगी रुग्णालयात सिरियस होते. प्रकृती खालावत चालल्याने मंगळवारी दुपारी त्यांना पालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात उचारार्थ दाखल करण्यात आले. मंगळवारी मध्यरात्री 3 ते 3.30 वा. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी पालिका रुग्णालयात तोडफोड केली. दरवाजे तोडणे, काचा फोडणे, उपाचारासाठी असणारे मशिनची नासधुस तसेच ऑक्सिजन सिलेंडरची तोडफोड केली. त्याचबरोबर तेथील डॉक्टर, वॉर्डबॉय, नर्सेस यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन मारहाण केली. जेथे तोडफोड करण्यात आली तेथे इतर रुग्णही उपचार घेत होते. या प्रकारामुळे त्यांना धक्का बसला असून मानसिक त्रासाला सामोरे जारे लागले आहे. याप्रकरणी महापालिकेच्यावतीने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच तोडफोड करणार्‍यांकडे चाकु, कट्टा अशी हत्यारे असल्याचेही तक्रारीत नमुद केले आहे. त्यांच्या हल्ल्यात  रुग्णालयाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन काहींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीसांकडून सुरु आहे. रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.