टॅक्स रिटर्न करण्यास मुदतवाढ

करदात्यांना दिलासा; 31 मार्चपर्यंत भरु शकता टॅक्स

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे आयकर विवरणपत्र (टॅक्स रिटर्न) दाखल करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आणखी एका योजनेला मुदतवाढ देण्यात आल्याने करदात्यांना दिलासा मिळाला आहे. डायरेक्ट टॅक्सबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने ‘विवाद से विश्‍वास’ ही योजना सुरू केली होती. या योजनेमुळे डायरेक्ट टॅक्सबाबतच्या समस्यांचा निपटारा होत असल्याने करदात्यांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे आता या योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) अधिसूचना जारी करून याबाबतची माहिती दिली आहे. या योजनेतंर्गत कर भरण्याची मुदत 31 मार्च 2021पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेतंर्गत कर भरण्याची मुदत तिसर्‍यांदा वाढवण्यात आली आहे. ‘विवाद से विश्‍वास’ योजनेनुसार समस्यांचा निपटारा करून कर भरण्याची इच्छा असणार्‍या करदात्यांना दिलासा देण्यासाठी या योजनेला मुदतवाढ देण्यात आल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. कोणत्याही अतिरिक्त रकमेशिवाय किंवा दंडाशिवाय करदात्यांना 31 मार्च 2021पर्यंत कर भरता येणार आहे. आधी ही मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत होती. आता ती वाढवण्यात आली आहे. करदात्यांच्या सुविधेसाठी या योजनेला मुदवाढ देण्यात आल्याचे वित्त सचिव अजय भूषण पांडे यांनी सांगितले. करांबाबत असलेल्या समस्या, तक्रारी आणि वाद यांचा निपटारा करून करदात्यांना कर भरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा कायदेशीर खर्च वाचणार आहे. तसेच वादाचा निपटारा होऊन व्यवस्थेवर विश्‍वास वाढणार आहे. त्याचसोबत दंड, व्याजाचा खर्च वाचून आर्थिक फायदा होणार आहे. 

‘विवाद से विश्‍वास’ ही योजना 17 मार्च 2020 पासून लागू करण्यात आली आहे. या योजनचा लाभ घेत करभरणा करण्याची मुदत 31 मार्च 2020 पासून वाढवत ती 30 जून 2020 करण्यात आली होती. त्यानंतर ती मुदत 31 डिसेंबर 2020 करण्यात आली होती. आता पुन्हा या योजनेला 31 मार्च 2021पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.