विनापरवानगी वृक्षतोड केल्यास दखलपात्र गुन्हा

नवी मुंबई : वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा होणारा र्‍हास रोखण्यासाठी वृक्षतोड थांबणे अत्यंत गरजेचे आहे. यापुर्वी वृक्षतोड केल्यास अदखलपात्र गुन्हा नोंदविला जात होता. परंतु आता विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करणार्‍यांवर नियमानुसार दखलपात्र गुन्हे नोंद करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकारी यांना देण्याविषयी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती केलेली आहे.

अनेकदा अशाप्रकारची परवानगी न घेताच वृक्ष तोड करणे अथवा वृक्ष छाटणी केल्यास याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंदविला जात होता. मात्र याबाबत महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, 1995 मधील कलम 2 (ग) व 3 अन्वये गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अशाप्रकारे विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करणार्‍यांवर नियमानुसार दखलपात्र गुन्हे नोंद करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकारी यांना देण्याविषयी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती केलेली आहे. त्यास अनुसरून आता महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, 1995 मधील कलम 2 (ग) व 3 तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन नियम 2009 सह शासन आदेश अधिसूचना मधील कलम 21(1) व 2 नुसार विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करणार्‍यांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.संबंधित विभाग कार्यालय क्षेत्रातील उद्यान अधिक्षकांमार्फत हे दखलपात्र गुन्हे दाखल करणे व या नोंदीत गुन्ह्यांसंदर्भात न्यायालयीन प्रकरणांबाबत महानगरपालिकेचा विधी विभाग आणि तालिका वकील यांच्याशी समन्वय ठेवून प्रकरणांचा निपटारा करण्याची जबाबदारी आपापल्या परिमंडळांसाठी परिमंडळ 1 व 2 च्या प्रभारी उद्यान अधिकारी यांचेवर सोपविण्यात आलेली आहे.