पनवेलमध्ये गुटख्याचा साठा जप्त

 7,80,866 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पनवेल ः नवी मुंबईनंतर पनवेलमध्ये गुटखासाठा जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी करंजाडे येथे छापा टाकला असता एका इको कारमध्ये मानवी शरीराला अपायकारक असणारा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा म्हणजेच गुटख्याचा साठा असल्याचे निष्पन्न झाले असून, सदरचा साठा पनवेल शहर पोलिसांनी जप्त केला आहे. सदरचा प्रतिबंधित माल हा आरोपी विरेंद्र बुद्धसेन गुप्ता यांचा असल्याने गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता, घरामध्ये सुद्धा सदरच्या प्रतिबंधित मालाचा साठा व ग्राहकांना गुटखा खरेदी करण्यासाठी आमिष दाखविण्यासाठी आणलेले 8 एलईडी टिव्ही देखील जप्त करण्यात आले आहेत.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 

पोलीस उपनिरीक्षक विश्‍वासराव बाबर, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे व पोलीस अंमलदार यांनी गुप्त बातमीच्या आधारे माहिती प्राप्त करून करंजाडे येथे छापा टाकून विरेंद्र गुप्ता या आरोपीला अटक केली आहे.या गुन्ह्यात पनवेल शहर पोलिसांनी 1,83,636 रुपये किंमतीची गुटख्याची पाकिटे, 50230 रुपये रोख रक्कम, 1,47,000 रुपये किंमतीचे 8 सॅमसंग एलईडी टिव्ही आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली 4 लाख रुपये किंमतीची इको कार असा एकूण 7,80,866 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरच्या गुन्ह्यातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, गुटखा विक्रीबाबत केलेल्या कारवाईमुळे गुटखा माफियांना आता चांगलाच हादरा बसला आहे. त्यामुळे पनवेल तालुक्याच्या हद्दीत गुटखा विक्री होताना यापुढे आढळून आल्यास गुटखा माफियांची पोलिसांकडून अजिबात गय केली जाणार नाही असा विश्‍वास पनवेलच्या जनतेमधून व्यक्त केला जात आहे.