महापालिका निवडणूक नाईकांसाठी अग्निपरिक्षेची

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जानेवारीत घेण्याची मनीषा सरकारची असून दिवाळीत कोरोना संक्रमण  कितपत फैलावते यावर निवडणुकीची तारीख अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना महाआघाडी स्थापन करून पालिका निवडणूक लढवणार असल्याने नाईकांच्या नेतृत्वाखालील भाजपाला या निवडणुकीत कितपत यश मिळते यावर त्यांचे राजकीय भविष्य ठरणार असल्याचे बोलले जात आहे.    

गेली 30 वर्ष नवी मुंबईची सत्ता एक हाती सांभाळणार्‍या गणेश नाईकांपुढे तूर्ततरी महाविकास आघाडीने मोठे आव्हान उभे केल्याचे चित्र नवी मुंबईत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईकांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीत मोठी नाराजी असून महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उट्टे फेडण्याची संधी शरद पवार यांना आली आहे. कोरोना संक्रमणाच्या आधी त्यांनी निवडणुकीचा आढावा घेऊन हि जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्याचे निश्‍चित केले होते. त्या अनुषंगाने आव्हाड यांनी नवी मुंबईत येऊन नाईकांच्या गडात आपल्या बुलंद आवाजाने ललकारीही ठोकली,परंतु कोरोनाचे संक्रमण सुरु झाले आणि पालिकेची निवडणूक अनिच्चीत काळासाठी पुढे ढकलली गेली. 

बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईतही निवडणूक होऊ शकतात काय याची चाचपणी राज्य सरकारने सुरु केल्याने पुन्हा एकदा नवी मुंबईतील  राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गणेश नाईक वयाच्या सत्तरीत तरुणाला लाजवेल असा उत्साह दाखवत असून ऐन करोना संक्रमणातही दर सोमवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन नवी मुंबईचे अनेक प्रश्‍न त्यांच्रा नजरेस आणून देत आहेत. यापूर्वी हि कामे ते महापौर व स्थारी समितीच्या माध्यमातून करून घेत असत पण आता प्रशासक नेमल्याने ते स्वतः पालिकेला भेट देत आहेत. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, खासदार राजन विचारेही पालिकेत आयुक्तांची भेट घेऊन सतत जनतेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. 

राज्यात पहिल्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना रांचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यांतरची हि पहिलीच पालिकेची निवडणूक आहे. त्यातच यापूर्वी हि राज्यातील एकमेव  पालिका राष्ट्रवादीकडे होती परंतु नाईकच भाजपात गेल्याने राष्ट्रवादीकडे एकही महापालिका नसल्याने मोठ्या जिद्दीने पुन्हा पालिकेवर झेंडा फडकवण्याचा निश्‍चय पवार यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेण्याचे जरी ठरवले असले तरी जागावाटपाचा तिढा जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत महाआघाडीचे खरे नाही असे दबक्या आवाजात बोलले जात आहे. समोर असणार्‍या आव्हानाची जाणीव नाईकांना असल्याने त्यांनी अनेक विरोधी पक्षातील नाराजांना गोंजारले  असून जर तिकीट न मिळाल्यास त्यांना बंडखोरीसाठी रसद पुरवण्याचीही रोजना तयार ठेवली आहे. नाईकांनी शिवसेना सोडल्यापासून नवी मुंबईवर भगवा फडकवण्याचा बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे जरी प्रयत्न करत असले तरी नवी मुंबई शिवसैनिकतून त्यांना किती प्रतिसाद मिळतो यावर नवी मुंबईतही शिंदेशाहीचा अंमल सुरु होणार कि नाही ते ठरेल. दरम्यान गणेश नाईक यांना पालिका निवडणुकीत यावेळी शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड व उद्धव ठाकरे सारख्या दिग्गजांना सामोरे जावे लागणार असून त्यात राज्यातील सत्ताही महाविकास आघाडीकडे असल्याने हि निवडणूक नाईकांसाठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे.