अपघात टाळण्यासाठी पालिकेचे नियोजन

कालबध्द उपाययोजना करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश

नवी मुंबई ः देशातील दरवर्षी होणार्‍या मृत्यूंचा तपशील पाहिला असता रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणावर नागरिक मृत्यूमुखी पडत असल्याचे निदर्शनास येते. शासनाच्या परिपत्रकानुसार महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महानगरपालिकेतही ‘रस्ता सुरक्षा समिती’ गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमार्फत शहरातील अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी अपघात होऊ नये याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येते. 36 अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक उपाययोजना प्राधान्यक्रम ठरवून तत्परतेने व कालबध्द रितीने करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे याबाबत केलेल्या कार्यवाहीचा तपशील पुढील महिन्यातील समितीच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अभियांत्रिकी विभागास दिले.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत या रस्ता सुरक्षा समितीच्या विशेष सभेमध्ये वाहतुक पोलीस विभागामार्फत सूचित करण्यात आलेल्या नवी मुंबई शहरातील 36 अपघातप्रवण क्षेत्रांविषयी (ब्लॅक स्पॉट) सविस्तर चर्चा करण्यात आली. रस्ता सुरक्षेचा गांभीर्याने विचार करीत शहरांतील अपघात प्रवण क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी दिल्ली इन्टीग्रेटेड मल्डीमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम यांचेमार्फत प्राप्त अहवालानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने 26 ऑक्टोबर 2018 रोजी परिपत्रक जारी करण्यात आले. त्या परिपत्रकास अनुसरून महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महानगरपालिकेतही ‘रस्ता सुरक्षा समिती’ गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमार्फत शहरातील अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी अपघात होऊ नये याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येते. रस्ता सुरक्षेचे महत्व लक्षात घेऊन वाहतुक पोलीस विभागाने पाहणी करून व तपशील तपासून निश्‍चित केलेल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 36 ब्लॅक स्पॉटवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले व त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांमार्फत देण्यात आले. त्याचप्रमाणे याबाबत केलेल्या कार्यवाहीचा तपशील पुढील महिन्यातील समितीच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अभियांत्रिकी विभागास दिले. याविषयी नमुंमपा नागरी रस्ता सुरक्षा (परीक्षण) सुधारणा आराखडा तयार करण्यासाठी नियुक्त सल्लागार मे. टंडन अर्बन सोल्युशन यांचेमार्फत शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करण्यात आला व त्यामधून तयार केलेल्या अहवालाचे सादरीकरण या बैठकीमध्ये मे. टंडन अर्बन सोल्युशनचे प्रतिनिधी रविंद्र एस. यांनी केले.  या सादरीकरणाव्दारा महानगरपालिका परिसरातील 36 अपघात प्रवण क्षेत्रांचा (ब्लॅक स्पॉट) विस्तृत आढावा घेण्यात आला. या सर्व क्षेत्रांचे तांत्रिकदृष्ट्या सर्वेक्षण करून त्याठिकाणी सल्लागारांमार्फत सूचविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वी झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन, थर्मोप्लास्ट पेंट, कॅटाईज ब्लिंकर्स, रम्बलर अशा तात्पुरत्या स्वरुपाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये अधिक प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने त्या क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती व वाहतुकीची वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्या त्या क्षेत्राच्या गरजेनुसार रोलर क्रॅश बॅरिअर, पादचारी पुल, रोड जॉमेट्री इंम्प्रुव्हमेंट, टेबल टॉप क्रॉसिंग, पथदिवे व्यवस्थेत वाढ अशा उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. या सूचीत 36 ब्लॅक स्पॉटमधील तातडीने कार्यवाही करण्याची गरज असलेल्या प्रामुख्याने अरेंजा कॉर्नर सिग्नल ते कोपरीगांव सिग्नल, मोराज सिग्नल ते एन.आर.आय. सिग्नल, अन्नपूर्णा सर्कल ते माथाडी सर्कल सिग्नल, सायन पनवेल हायवेवरील सानपाडा जंक्शन अशा 4 ब्लॅक स्पॉटवर त्वरीत कार्यवाही कऱण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला देण्यात आले. तसेच या 4 ठिकाणांप्रमाणेच उर्वरित 32 स्पॉटवरही सुयोग्य नियोजन करून कालबध्द पध्दतीने तत्परतेने काम करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले.