विधान परिषदेसाठी 12 जणांंच्या नावाचा प्रस्ताव

मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 जागांचा नावांची यादी बंद लिफाफ्यात महाविकासआघाडी सरकारने शुक्रवारी राज्यपालांकडे सादर केली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्रासह ही यादी देण्यात आली आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने 12 जागांचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर केला होता. शुक्रवारी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली. या यादीतील काही नावे समोर आली आहेत. 

काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, अनिरुद्ध वनकर आणि मुझफ्फर हुसेन या नावांची शिफारस केल्याचे तर राष्ट्रवादीकडून भाजपमधून आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे याशिवाय राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे या नावांची शिफारस केल्याचे समजते. शिवसेनेकडून शिवसेना उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर,चंद्रकांत रघुवंशी, यांचे नाव सूचविल्याची माहिती मिळत आहे.