एमआयडीसीकडून पालिकेला मिळणार पंधरा भुखंड

नवी मुंबई : एमआयडीसीकडून नवी मुंबई महापालिकेला आरोग्यसेवेसाठी सहा तर जलकुंभासाठी 9 भुखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी सुविधांबाबत नवी मुंबई महापालिका व एमआयडीसी यांच्यात गुरुवारी महत्वपुर्ण बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच एमआयडीसीकडून होत असलेला कमी दाबाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सिडको आणि एमआयडीसी ही दोन महत्वाची शासकीय प्राधिकरणे आहेत. विविध भुखंड व नागरी सुविधांची कामे सहकार्यातून सोडविण्यासाठी पालिका व एमआयडीसी यांच्यात गुरुवारी बैठक झाली. पालिकेकडे दोन नागरी आरोग्य केंद्र तर रुग्णालयांसाठी चार भुखंड तसेच जलकुंभासाठीच्या नऊ भुखंडाबाबत यावेळी चर्चा करण्यात आी. यावर तत्परतेने हे भुखंड हस्तांतरण करण्याबाबत कार्यवाही पुर्ण करण्यात येईल असे एमआयडीसीकडून सांगण्यात आले.  महानगरपालिका क्षेत्रातील शहरी भागात महापालिका मुबलक पाणीपुरवठा करत आहे. मात्र काही गावठाण व झोपडपट्टी भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. 35 दशलक्ष लिटर गावठाण क्षेत्रासाठी व 35 दशलक्ष लिटर झोपडपट्टी भागासाठी असे प्रतिदिन 70 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र काही महिन्यांपासून कमी दाबाने पामीपुरवठा होत आहे. ही अडचण  दुर करण्यासाठी तत्पर कार्यवाही करण्याबाबत आयुक्तांनी यावेळी सूचना दिल्या. नेरुळ झोपडपट्टी , रमेश मेटल क्वारी, महात्मा गांधीनगर, सरोज कॉकरी या ठिकाणी एमआयडीसी जलवाहिनीवर जोड वाढवून देण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देशही देण्यात आले. औद्योगिक वसाहत क्षेत्रात एकूण 29 झोपडपट्ट्या असून त्यामध्ये 25 हजार 673 झोपडीधारक आहेत. त्यांच्याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन योजना राबविण्यासाठी भुखंड हस्तांतरित करण्याबाबत तसेच महापे बसस्थानक भुखंड हस्तातरणाबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत पालिकेला एमआयडीसीने सूचित केले. सहकार्याने कामे केली तर कामांना गती येईल व नागरिकंाना अधिक सेवा दिल्या जातील त्याअनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली.  या बैठकीला पालिका आयुक्तांसह एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सतीश बागुल, उपरचनाकार संतोष शेळके, उपअभियंता शशिकांत गीते तर पालिकेचे शहर अभियंता सुरेंद्र  पाटील, मालमत्ता विभागाचे उपआयुक्त राजेश कानडे व इतर अधिकारी उपस्थित होते.