8 वर्षांनी हत्येचा उलगडा

आरोपी गजाआड ः पोलीसांचे कौतुक

नवी मुंबई : एपीएमसीजवळ डिसेंबर 2012 मध्ये आनंदा सुकाळे या माथाडी कामगाराची हत्या झाली होती. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दशरथ कांबळे याला अटक केली आहे. पैसे लुटण्यासाठी ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. 

तुर्भे एस. टी. डेपोच्या भूखंडावर 29 डिसेंबर 2012 रोजी माथाडी कामगार आनंदा सुकाळे याचा मृतदेह आढळला होता. त्याच्या डोक्यावर वार करून नायलॉनच्या रस्सीने गळा आवळून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे एपीएमसी परिसरात प्रक्षोभक वातावरण निर्माण झाले होते. आरोपी न सापडल्यामुळे ऑगस्ट 2013 मध्ये या गुन्ह्याचा तपास तात्पुरता थांबविण्यात आला होता. मे 2016 मध्ये पुन्हा तपास सुरू केला व फेब्रुवारी 2017 मध्ये तो पुन्हा बंद करण्यात आला. पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांनी तपास न लागलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यावर लक्ष देण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या होत्या. यामुळे माथाडी कामगाराच्या हत्येच्या गुन्ह्याचाही पुन्हा तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शाखा कक्ष दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, गणेश कराड व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला व तुर्भे येथे राहणार्‍या दशरथ कांबळे उर्फ आप्पा याला अटक केली. 

अटक केलेला आरोपी हा मयत आनंदा याच्या परिचयाचा होता. आनंदा हा जुगारात 25 हजार रुपये जिंकला होता. ते पैसे लुटण्यासाठी आरोपीने भाजीपाला मार्केटमध्ये त्याच्यावर हल्ला केला व त्याचा खून केला. मृतदेह नाल्याजवळ गवताने झाकून ठेवला. दुसर्‍या दिवशी मृतदेह रिक्षात ठेवून तो एस. टी. डेपोच्या भूखंडावर टाकून पसार झाला. आरोपीवर यापूर्वीही जबरी चोरी, चोरी, दरोडा असे गुन्हे दाखल आहेत. त्याला हद्दपारही केले होते. आठ वर्षांपासून तो तपास यंत्रणेला गुंगारा देत होता. फाईल बंद झालेल्या प्रकरणातील आरोपीला जेरबंद केल्यामुळे तपास करणार्‍या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुन्हे शाखेने कौशल्यपुर्ण तपास करत या गुह्याचा छडा लावला.

  •  पोलीस पथकाने एपीएमसी मार्केटमधील सुरक्षारक्षकांच्या माध्यमातुन तपासाला सुरुवात केली. त्यानंतर एपीएमसी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवर असलेला व पुर्वी हद्दपार करण्यात आलेल्या दशरथ कांबळे याची माहिती मिळाली. त्यामुळे गुन्हे शाखेने आरोपी दशरथ कांबळे याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला या हत्येच्या गुह्यात 8 वर्षानंतर अटक करण्यात आली. आरोपी दशरथ कांबळे याच्यावर यापुर्वी जबरी चोरी, चोरी, दरोडा अशा प्रकारचे गुन्हे असल्याने तो मागील आठ वर्षापासून या हत्येपासून स्वत:ला दुर ठेवुन पोलिसांची दिशाभुल करत होता.