गो बॅक नैना...गो बॅक...

सिडकोच्या प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्तांच्या घोषणा

नवी मुंबई ः सिडको विकसीत करत असलेल्या नैना प्रकल्पाला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत असून यासंदर्भात झालेल्या बैठकीत ‘गो बॅक नैना’ च्या घोषणा देण्यात आल्या. 95 गावे, नैना व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सिडकोला दिला असल्याने भविष्यात सिडकोविरुद्ध प्रकल्पग्रस्त असा संघर्ष नवी मुंबईत पहायला मिळणार आहे. 

3 नोव्हेंबर रोजी नेरे येथे नैना प्रकल्प व विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रकल्प बाधित शेतकर्‍यांना घरे तोडण्यासाठी सिडकोने बजावलेल्या नोटीसा व  विकास शुल्क व बटरमेंट चार्जेस स्वरूपात करोडो रुपयांची  मागणी याबाबत प्रकल्पग्रस्तांना पाठविलेल्या नोटिस विरुद्ध नैना प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत शेकडो प्रकल्पग्रस्तांनी आपली उपस्थिती दर्शवून आपल्यावर सिडकोकडून होत असलेल्या अन्यायाला वाट मोकळी करुन दिली. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी  अ‍ॅड. सुरेश ठाकूर यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी यावेळी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांचे उपजीविकेचे असलेले जमीन हे साधन हिसकावून घेऊन धनदांडग्या व्यवसाय करणार्‍या लोकांसाठी नैना प्रकल्पा अंतर्गत विना सहमतीने समाविष्ट करून वर विकास शुल्क व बटरमेंत चार्जेस स्वरूपात त्यांच्याकडूनच करोडो रुपयांची मागणी नोटिस बजावल्याने सिडको मार्फत प्रकल्पग्रस्तांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा घणाघाती आरोप केला. तसेच शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतजमिनीत बांधलेली घरे  तोडण्यासाठी बजावण्यात आलेल्या नोटिसा त्यांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या असून या बाबत संघर्ष समिती मार्फत ठोस भूमिका घेऊन अन्याय विरोधात लवकरच कायदेशीर आंदोलन उभारण्याची घोषणा केली. नवी मुंबई उरण-पनवेल येथील सिडको प्रकल्प बाधित शेतकरी बांधवांची घरे नियमीत करणे, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना 3.75% भूखंड परत मिळविणे, वाढीव जमिनीचा मोबदला मिळविणे, विद्यावेतन या बाबत तसेच विमानतळ प्रकल्पाविरोधात त्यांच्या न्याय हक्कासाठी, प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी ठोस भूमिका घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 

या प्रकल्पामुळे नैना क्षेत्रातील लाखो वृक्षांची तोड होणार असून त्यामुळे पर्यावरणालाही मोठी हानी होणार असल्याची भुमिका ठाकूर यांनी मांडली. शिवाय सृष्टीच्या स्थापनेपासून या क्षेत्रात असणार्‍या जैवव्यवस्थेलाही मोठा धोका या प्रकल्पाने पोहचणार असून  त्याची भरपाई सिडको कशी करणार? याचा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट सिडकोने सादर करावा अशी मागणी त्यांनी केली. 

शेकडो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत लोकांनी ‘गो बॅक नैना’ अशा घोषणा देऊन सिडकोच्या अन्यायाविरुद्ध मोठे आंदोलन उभारण्याची शपथ घेतली. यावेळी स्व.दि.बा पाटील यांच्या काळात झालेल्या रक्तरंजित आंदोलनाची जाणीव वक्त्यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना करुन देऊन आपल्या पुढील पिढीच्या भविष्यासाठी दंड थोपटण्याची हिच वेळ असल्याचे सांगितले. या सभेत सुधाकर पाटील, नामदेव फडके, अड.ॅमदन गोवारी, रमाकांत पाटील,आर.डी.घरत, सुरेश पवार,लाड साहेब, अनिल ढवळे,गोवींदू पाटील, वामन शेळके,रूपेश पाटील, बबन फडके, बाळाराम फडके, बळीराम पाटील,विजय गुप्ता,वासू गवते, पुष्पाताई म्हसकर, रमेश फडके प्रकाश म्हसकर, बाळकृष्ण गवते, बळीराम भोपी तसेच नेरे गावांतील शेतकरी व नैना प्रकल्प व विरार-अलिबाग कॉरिडॉर बाधित प्रकल्पग्रस्त उपस्थित  होते.