बि‘हार’ नक्की कोणाचा...

संजयकुमार सुर्वे

बिहार राज्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आतापर्यंत 2 टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. 243 जागा असलेल्या बिहारच्या विधानसभेत 28 ऑक्टोबरला 51 जागांसाठी, 3 नोव्हेंबरला 94 जागांसाठी मतदान झाले असून उर्वरित 78 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या दोन दिवसात सरासरी 55% मतदान झाले आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, लोक जनशक्ती पार्टी शिवाय बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांनी या निवडणुकीत नशीब आजमावले आहे. मायावतीने आपले समर्थन भाजपाला दिले असून भाजपाची बी टीम म्हणून टीका होत असलेले असुद्दीन ओवेसीही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. गेली 15 वर्ष बिहारमध्ये सत्तेत असणार्‍या नितीश कुमारांची सत्ता येते कि राष्ट्रीय जनता दल सोबत युती करणार्‍या काँग्रेसची सत्ता बिहारमध्ये येते यावरून बि‘हार’ नक्की कोणाचा हे 10 नोव्हेंबरला ठरणार आहे.

कोरोना संक्रमणात बिहार आणि मध्यप्रदेशात निवडणूक घेऊ नयेत अशी मागणी सर्वच विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. पण विरोधकांमध्ये असलेला विस्कळीतपणाचा फायदा घेण्याच्या अनुषंगाने या निवडणूका मध्य प्रदेश आणि बिहार जनतेवर लादल्या गेल्या असल्याचे बोलल्यास वावगे ठरू नये. भारतीय जनता पक्षाने जुलै ऑगस्ट पासूनच निवडणुकांची तयारी बिहारमध्ये सुरु केली होती. कोरोना संक्रमणाच्या काळात अंदाजे 25 कोटी रुपये व्हर्चुअल रॅलीवर खर्च केल्याने मोठी टीकेची झोड भाजपवर उठली होती. त्याचबरोबर भाजपने अप्रत्यक्षपणे लोक जनशक्तीच्या ‘चिराग’ मध्ये तेल घालून तो बिहारमध्ये ज्यास्त  प्रकाशमान होईल याकडेही लक्ष दिले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिराग पासवान यांनी एनडीए पासून फारकत घेऊन स्वतंत्र निवडणुकीची घोषणा केली. बिहारमध्ये तगडा विरोधी पक्ष नाही, काँग्रेसचे अस्तित्व नाही, चारा घोटाळ्यात अडकलेल्या लालूंच्या लालटेन मधील ‘तेज’ हरपल्याने खुशीत असलेल्या भाजपने बिहारमध्ये सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने एकाच वेळी नितीश आणि चिराग यांचा गेम केला. यामागे बिहारमध्ये भाजपाची सत्ता यावी हे जरी उद्दिष्ट असले तरी 10 तारखेला या रणनीतीवर शिक्कामोर्तब होते कि कंदीलालाच पसंती मिळते हे ठरणार आहे. 

आता निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊ  लागला आहे आणि लोकांच्या मिळणार्‍या प्रतिसादावरून बिहारमध्ये भाजपचे राजकीय गणित महाराष्ट्रसारखे चुकणार तर नाही ना याची शंका येऊ लागली आहे. साडेतीन वर्षापुर्वी भाजपने आरजेडी व जेडीयूची आघाडी फोडून बिहारमध्ये नितीशकुमार सोबत गठबंधंन करून सत्तेचा सोपान मिळवला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर अनेक शासकीय यंत्रणा लालू यादव यांच्या पाठीमागे लावून लालटेनच्या जनमानसातील प्रतिमेवर अजून काजोळी कशी चढेल यासाठी प्रयत्न केले. पण कोरोना संक्रमण देशात अवतरले आणि मोदींसह नितीशकुमार यांचेही प्रशासकीय कौशल्य देशासमोर उघडे झाले. बिहार मधील लाखो कामगार घरी जाण्यासाठी टाहो फोडत असताना मोदींचे केंद्र सरकार आणि नितीशकुमारांचे  बिहार सरकार कडून  कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याची चीड व असंतोष लोकांमध्ये धुमसत असताना अशा विरोधी वातावरणात निवडणूक घेणे निश्चितच धाडसी निर्णय होता. परंतु, आमच्या समोर विरोधकच नाहीत असे म्हणून महाराष्ट्रात जशा गमजा मारल्या त्याच अहंकारात बिहारच्या निवडणुकीला भाजपवाले सामोरे गेले आहेत, एवढेच नाही तर पुन्हा फडणवीस यांनाच निवडणूक प्रभारी बनवून बिहारच्या चांगल्या वाईट निर्णयासाठी त्यांच्या अनाहूत राजकीय  बळीची व्यवस्था करून ठेवली.

भाजप कोणतीही निवडणूक पूर्ण तयारीनिशी व विशिष्ट धोरण आखून लढत असते. आजपर्यंत सर्वच विरोधकांना भाजपाने आपल्या पीचवर  निवडणुकीचा खेळ खेळायला लावला याला अपवाद फक्त केजरीवालचा आहे. काँग्रेससह सर्वच विरोधीपक्ष त्यांच्या या खेळीला बळी पडून बर्‍याचदा जिंकणारी बाजी हरवून बसले आहेत. यामध्ये गोवा, गुजरात सारख्या राज्यांचा समावेश करता येईल. मागील अनुभवातून अजूनही काही शिकायला विरोधक तयार नाहीत याचाच फायदा भाजप उठवत आहे. परंतु, लालूंच्या ‘लाल’ने मात्र या रणनितीला छेद देत भाजपसह सर्वच पक्षांना आपल्या पिचवर खेळायला लावून आपल्या राजकीय परिपक्वतेची चुणूक देशाला दाखवून दिली. नितीश सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रीपद भूषवणार्‍या तेजस्वीना आपल्या राज्याच्या समस्यांची जाणीव असल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवते. गरिबी, बेरोजगारी आणि आरोग्य व्यवस्था या समस्या तूर्त बिहार राज्याला भेडसावत असून कोणत्या समस्येला जनतेत प्रचाराचा मुद्दा आपण बनवू शकतो याचा अंदाज घेत बेरोजगारीचा प्राधान्य दिले. सरकारमध्ये 4.5 लाख खाली असलेल्या जागा तात्काळ भरू हे आश्वासन काय दिले आणि निवडणुकीचे चित्रच पालटले. सुरुवातीला तेजस्वीच्या घोषणेची टिंगल उडवणार्‍यांना त्यातील गांभीर्य समजल्यावर मात्र भाजपसह काँग्रेसपक्षही लाखो लोकांना रोजगार देऊ असे सांगू लागले. येथेच भाजपतील  चाणक्यासह नितीशकुमारांचीही विकेट पडली. 15 वर्ष राज्य करणार्‍यांनी बिहारमध्ये किती रोजगार निर्माण केला ? असा प्रश्न प्रचारसभेत विचारून त्यांच्या घोषणेचा बुरखा टरा टरा फाडला.

विरोधकांचा मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव हा तरुण चेहरा असल्याने त्याला टक्कर देणारा तरुण चेहरा भाजपाला हवा होता. तो त्यांना विलास पासवान यांच्या ‘चिरागात’  सापडला. त्याला पुढे करून तेजस्वीला मिळणारी तरुणांची मते चिराग यांच्या पारड्यात कशी पडतील अशी रणनीती आखली शिवाय तेजस्वी आणि नितीश एकाच समाजाचे असल्याने त्यांच्या मतांची विभागणी चिरागच्या फायद्याची ठरेल अशी अटकळ भाजप चाणक्याने बांधली. जोडीला गोदी मीडिया आणि कट्टर हिंदुत्वाची जोड होतीच. पण या सर्वाला पुरून उरत तेजस्वीने  अशी धोबी पछाड मोदी, शहा, नितीश सारख्या धुरंधरांना दिली कि त्यांची पाळता भुई थोडी झाली आहे. सुरुवातीला 150 पर्यंत एनडीएला जागा मिळतील म्हणणारी गोदी मीडिया आता 90 पर्यंत घसरली आहे. 

वडील लालू यादव तुरुंगात, लहान भावाचे प्रताप सांभाळत, शासकीय यंत्रणांच्या चौकशींना सामोरे जात तेजस्वीने आपल्या राजकीय वाटचालीत मोठी समजदारी दाखवली. या निवडणुकीच्या प्रचारात दररोज 15 सभा घेत असून मोठी आणि ललितपूर्ण भाषणे न करता आपल्या वडिलांप्रमाणे मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. त्यांच्या सभांना आज जमणारी लाखोंची गर्दी त्यांचा उत्साह वाढवणारी असली तरी त्यांचे मतात किती रूपांतर होते यावरच लालटेनचा प्रकाश अवलंबून असणार आहे. बिहारमध्ये या निवडणुकीत नितीशकुमारना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. तिथे भाजपासाठी प्रचाराला आलेल्या योगिनाथांनाही प्रचाराचा गाशा गुंडाळावा लागला आहे.  त्यांच्यावर नाराज असणारी मते हि चिराग पासवानला जातात कि तेजवसीला मिळतात हे निकाल नंतर स्पष्ट होईल.  बिहारचे राजकारण हे जाती-पाती वर अवलंबून असून चिराग नितीशकुमारला चटका देतात कि तेच  बुझतात हे 10 नोव्हेबरला  कळेल. आता पर्यंत 165 जागांसाठी मतदान झाले असून 80 जागा महागठबंधनला मिळतील असा अंदाच प्रसारमाध्यमे वर्तवित आहेत. 7 तारखेला होणार्‍या उर्वरित 78 जागांमधून 50 जागा पदरी पडल्या तरच तेजस्वी यादव बाजी मारू शकतील आणि भविष्यात आपल्या वडीलांप्रमाणे भारतीय राजकारणातील ‘बाजीगर’ची भूमिका वटवू शकतील.  

बिहार बरोबरच मध्य प्रदेशातही 28 ठिकाणी निवडणुका होऊ घातल्या आहेत. तेथेही शिवराज मामाला सर्व काही आलबेल असल्याचे वातावरण नाही. 28 जागांपैकी 22 जागांवर काँग्रेस पक्ष निवडणूक जिंकून पुन्हा कमबॅक करेल असे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यातील निवडणूका आगामी देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.  याचे महत्व विरोधकांना असल्याने त्यांनी या दोनही राज्यातील निवडणूका गांभीर्याने घेतल्या आहेत. करोना संक्रमण, घसरती अर्थव्यवस्था, फसलेली विदेशनीती यामुळे मोदींचीही लोकप्रियता आता उतरंडीला लागली आहे. एनडीएची  पूर्ण धुरा आता मोदींच्या खांद्यावर असली तरी भाषणातील हरवलेले नावीन्य, भारत-पाकिस्तानच्या आलापाला  लोक आता कंटाळू लागले आहेत. त्यांच्या ‘मन की बात’ लाही लोक मोठ्याप्रमाणावर डिसलाईक करत आहेत. भाजपाने चुकीची धोरणे त्यागून विकासाचा मार्ग धरला नाही तर उत्तरोत्तर हा विरोध वाढत जाणार असून त्याचा परिणाम जर वर्षभरात होणार्‍या उत्तरप्रदेश निवडणुकीत होईल आणि मग मात्र 2024 ची निवडणूक भाजपाला निश्चितच जड जाईल. त्यासाठी बिहारची निवडणूक मोदींच्या पारड्यात मते टाकते कि तेजस्वीच्या याकडे सर्वांचे लक्ष असून 10 तारखेलाच बि‘हार’ कोणाचा हे चित्र स्पष्ट होईल.