कळंबोली उड्डाणपुलाखाली कुंपण उभारणार

पनवेल : कळंबोली उड्डाणपुलाखाली भिकारी, फिरस्त्यांची धोकादायक वस्ती निर्माण झाल्याने नागरिकांचा आक्रोश वाढत चालला होता. तिथे लोखंडी जाळीचे कुंपण घालण्यास महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे येथील भिकारी आणि फिरस्त्यांच्या अनधिकृत वस्तीला अटकाव बसणार आहे. 

पनवेल तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली मागे ठरल्याप्रमाणे बैठक संपन्न झाली. भिकारी, फिरस्त्यांची वस्ती, त्यातून अपघाताचा धोका, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आणि फुले विक्री, भीक मागण्यासाठी करण्यात आलेल्या मानवी तस्करीचा संशय लक्षात घेवून पनवेल संघर्ष समितीने केलेल्या मागणीला महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या उपस्थित पदाधिकार्‍यांनी हिरवा कंदिल दर्शविला. त्यानुसार दोन दिवसात खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठांच्या परवानगीकरिता प्रस्ताव पाठविला जाईल. त्यानंतर आठवडाभरात पुढील कार्यवाही पूर्ण करून लोखंडी जाळीचे दोन्ही बाजूला कुंपण उभारण्याचे बैठकीत ठरले. एमएसआरडीसीच्या निर्णयामुळे यापुढे भिकारी आणि फिरस्त्यांच्या अनधिकृत वस्तीला कायमचा अटकाव बसेल. त्यामुळे कळंबोली वाहतूक बेट मोकळा श्‍वास घेईल आणि वाहन चालकांनाही दिलासा मिळणार आहे.