खासगी बसच्या तिकीट दरात दुप्पट वाढ

मुंबईः यंदा दिवाळीत एसटी महामंडळाने तिकीट दारत वाढ न करण्याचा निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे दिवाळी आणि सुट्ट्यांच्या हंगामाचा मुहूर्त साधत खासगी बसचालकांनी तिकीट दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. त्यामुळे या हंगामात खासगी बसने गावी जाणार्‍याच्या खिशाला कात्री लागत आहे. 

सध्या रेल्वेगाड्या मर्यादित आहेत. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे आरक्षण फुल होऊ लागले आहे. याच संधीचा फायदा घेत खासगी बस चालकांनी तिकीट दरात दुपटीने वाढ केली आहे. मुंबई ते नागपूर, औरंगाबाद, परभणी आदी सर्वच मार्गांवर खासगी बससेवांचे भाडे दीडपट ते दुप्पट वाढवले आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीच्या काळात मुंबई, पुण्यातून अनेक प्रवासी गावी जात असतात. याच संधीचा फायदा घेत खासगी बस कंपन्या तिकीट दरात वाढ करतात. याबाबत तक्रारी येत असतात. शासन निर्णयाच्या मर्यादेपेक्षा जास्त भाडे आकारणार्‍या खासगी बसेसवर प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई करावी, असे आदेश परिवहन उपआयुक्तांनी दिले आहेत. सण, सुट्ट्यांच्या हंगामात खासगी बसचालकांकडून जादा दर आकारले जाण्याची तक्रार कायम असते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एसटीने गतवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत भाडेवाढ केली नाही.