शेमारू मराठीबाणा’ तर्फे दिवाळीत करमणुकीची मेजवानी

प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार मनोरंजक मराठी चित्रपट

भारतातील आघाडीचा ‘कंटेंट पॉवरहाऊस’ असलेल्या ‘शेमारू एन्टरटेन्मेंट’च्या ‘शेमारू मराठीबाणा’ या मराठी चित्रपट वाहिनीतर्फे दिवाळीनिमित्त मनोरंजनाचा महा उत्सव आज जाहीर केला. यंदा प्रत्येकाला घरात राहून सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले जात असल्याने ‘शेमारू मराठीबाणा’ तर्फे दिवाळीच्या दिवसांत शनिवारी व रविवारी, तीन चित्रपट लागोपाठ प्रदर्शित करण्यात येत आहेत. प्रेक्षकांना घरात बसून कुटुंबियांसमवेत चित्रपटांचा आनंद लुटता येईल व दिवाळीही साजरी करता येईल. या वाहिनीच्या वतीने स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे, रीमा लागू, मोहन जोशी आदींच्या भूमिका असलेले गाजलेले नवीन चित्रपट संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात वीकेंडच्या दिवसांमध्ये प्रदर्शित करण्यात येत आहेत.

‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर उच्च प्रतीचे मराठी चित्रपट प्रदर्शित करून मराठीभाषक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात येते. संपूर्ण कुटुंबासमवेत अविस्मरणीय प्रसंग साजरा करण्यावर या वाहिनीचा विश्‍वास आहे आणि त्यामुळेच ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजन, भाऊबीज अशा महत्त्वांच्या दिवशी चित्रपटांच्या इत्यादी प्रमुख कार्यक्रमांसह नोव्हेंबरमध्ये काही खास दिवस साकारण्यासाठी सलग काही चित्रपट सादर केले जाणार आहेत. विनोदी, नाट्यमय, प्रणयकथा अशा विविध श्रेणींमधील चित्रपटांचा यात समावेश असणार आहे.

येत्या 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता व पुन्हा सायंकाळी 6 वाजता ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ हा अतिशय नावाजलेला चित्रपट ‘शेमारू मराठीबाणा’ वर प्रदर्शित होईल. या चित्रपटात एका दाम्पत्याची कथा नमूद करण्यात आली आहे. लग्नानंतर काहीच दिवसांत नात्यात दुरावा निर्माण होऊन त्यांच्यातील प्रणय कसा संपुष्टात येतो आणि त्यावर उपाय म्हणून हे दाम्पत्य काय करते, याचे अतिशय रोमांचक चित्रण या चित्रपटात आहे. स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे आणि सई ताम्हणकर यांनी या कलाकृतीत गहिरे रंग भरले आहेत. ‘व्हीआयपी गाढव’ या चित्रपटाचा वर्ल्ड टीव्ही प्रीमिअर 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 व सायंकाळी 6 वाजता सादर होईल. गंगाराम या माणसाचे मुरली नावाचे गाढव एका पशुसंवर्धन अधिकार्‍याला जखमी अवस्थेत दिसते आणि त्यातून गंगाराम व त्याची पत्नी ही गावातील दोन साधी माणसे प्रसार माध्यमांच्या व राजकीय नेत्यांच्या नजरेत येतात. त्याची रंगतदार, विनोदी कथा यामध्ये आहे. भालचंद्र (भाऊ) कदम आणि शीतल अहिरराव यांनी यात पती-पत्नीची भूमिका केली आहे. अखेरीस, ‘होम स्वीट होम’ हा अतिशय साधी व मनाला भिडणारी कथा असलेला कौटुंबिक व लोकप्रिय चित्रपट सादर होणार आहे. दिवंगत अभिनेत्री रिमा लागू, मोहन जोशी व स्पृहा जोशी यांच्या भूमिका असलेला ‘होम स्वीट होम’ 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 व सायंकाळी 6 वाजता रसिकांसमोर येईल.

या दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येकाने घरात राहायचे आहे, तसेच सामाजिक अंतर राखायचे आहे. या काळात आपल्या कुटुंबियांबरोबर राहून मौजमजा करण्याची, आवडते चित्रपट एकत्रित पाहण्याची, उत्तमोत्तम खाद्यपदार्थ चाखण्याची आणि सुरक्षित राहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. ती आपण साधायची आहे.