अर्बन हाट येथे शिल्प मेळा

नवी मुंबई ः दिवाळीपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या हस्तकला प्रदर्शनाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सिडको अर्बन हाट येथे 18 नोव्हेंबर 2020 ते 30 नोव्हेंबर 2020 या कालावधीत सकाळी 11.00 ते रात्री 09.00 या वेळेत शिल्प मेळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिल्प मेळ्यामध्ये विविध राज्यांतील कारागीर सहभागी होणार असून त्यांनी निर्मिलेली हातमाग व हस्तकला उत्पादने या वेळी प्रदर्शनार्थ मांडण्यात येणार आहेत. 

आयोजकांकडून कोविड-19 विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच महोत्सवासाठी येणार्‍या रसिकांना प्रवेश दिला जाणार आहे. अर्बन हाटला भेट द्यायला येणार्‍यांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. तसेच प्रवेशद्वारावरच थर्मल स्कॅनिंग व सॅनिटायझर किंवा हॅन्ड वॉशने निर्जुंतुकीकरण केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश देण्यात येईल. तसेच पर्यटकांना स्टॉलभोवती गर्दी करण्यासही मनाई आहे. अर्बन हाटचा परिसर खुला असल्याने तसेच तेथे उभारण्यात येणारे स्टॉल आकाराने मोठे असल्याने सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे शक्य होणार आहे.

देशाच्या विविध भागांतील कारागिरांनी निर्मिलेल्या स्वदेशी उत्पादनांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने अर्बन हाट येथे आयोजित करण्यात येणार्‍या विविध महोत्सवांमध्ये ही उत्पादने प्रदर्शन व विक्रीकरिता मांडण्यात येतात. शिल्प मेळ्यामध्ये महाराष्ट्र व अन्य राज्यांतील भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (ट्रायफेड) आणि स्वयंसहाय्यता गटांतील कारागीर सहभागी होणार आहेत. रेशमी साड्या, ड्रेस मटेरिअल, चामड्याची उत्पादने, चित्र, कृत्रिम दागिने, ब्लॉक प्रिंट, गालिचे, पायपुसणी, सुती पिशव्या, सौंदर्य प्रसाधने, लखनऊ चिकन ड्रेस मटेरिअल, खादीचे कुर्ते, जेन्टस वेअर अशी विविध उत्पादने उपलब्ध असणार आहेत. हातमाग व हस्तकला उत्पादनांव्यतिरिक्त या मेळ्यामध्ये जैविक खाद्य उत्पादनेही (ऑरगॅनिक फुड) उपलब्ध असणार आहेत. याशिवाय अर्बन हाटच्या निसर्गरम्य परिसरात निसर्ग भ्रमणाची (नेचर ट्रेल) संधीही पर्यटकांना मिळणार आहे.