वीजबिलावरून मनसेचा राज्य सरकारला अल्टिमेटम

मुंबई : वीज बिल मुद्यावरून मनसे आंदोलन छेडणार असून, राज्य सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर जे काही घडेल त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे.

वाढीव विज बिलाच्या मुद्द्यावर गुरुवारी राजगडावर मनसेची बैठक पार पडली. या बैठकीसाठी राज्यभरातले नेते, सरचिटणीस, जिल्हाअध्यक्ष, विभाग प्रमुख, यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले होते. या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वीजबिलावरून राज्य सरकारला आक्रमक इशारा दिला असून सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. यावेळी नागरिकांनी देखील सामील व्हावं. हा प्रचंड प्रमाणात आक्रोश असून जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा देखील बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.

‘राज्य वीज मंडळाचे कर्मचारी वीज कापण्यास आले तर मनसैनिक स्वतः हजर असतील. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातून काही उलट-सुलट घटना घडल्यास त्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदारी असेल. त्यामुळे मंत्र्यांची बिले माफ होत असतील आणि सामान्य जनतेला त्रास देण्यात येत असेल तर मनसे शांत बसणार नाही’ असं देखील त्यांनी राज्य सरकारला ठणकावलं आहे.  मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांना भेटले, त्याशिवाय ऊर्जा सचिव, बीएमसी अधिकार्‍यांना भेटले. राज ठाकरे स्वत: राज्यपालांना भेटले. राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना भेटण्यास सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे हे शरद पवारांशी बोलले. पवारांनी राज ठाकरेंकडून निवेदनं मागवली. आम्ही ही निवेदनं दिली. तरीही त्यावर निर्णय घेतला गेला नसल्याचे नांदगावकार यांनी सांगितले.