राज्यातील ‘या’ भागांत पावसाचा अंदाज

मुंबई : ऑक्टोबर महिन्यात राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस झाला आणि शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता ऐन हिवाळ्यात राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या दक्षिण पश्‍चिम भागात पुढील 48 तास कायम राहणार आहे आणि यामुळे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील अनेक शहरांतील तापमान खालावले आणि थंडीची चाहूल लागली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत तापमान वाढल्याचे पहायला मिळत आहे. तर आता अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.