‘त्या’ वीज बिल थकबाकीची चौकशी होणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज बिल सवलतीच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. 

गुरूवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारच्या काळातील वीजबिलांची थकबाकी कशी वाढली यासंदर्भातील चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बुधवारी ऊर्जामंत्री नितीन राऊतांची संपूर्ण आकडेवारीसह थकबाकी कशी वाढली यासंदर्भातील माहिती सादर केली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील चौकशीचे आदेश दिले आहेत.एकीकडे भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्ष वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून आक्रमक होत असताना, दुसरीकडे ऊर्जामंत्र्यांनी उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारच्या काळातील वीज बिलांच्या थकबाकीसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकर्‍यांच्या कृषी पंप वीज बिलासंदर्भात निर्णय घेण्यात आला त्यानंतर इतर वीज बिलांबाबतही चर्चा सुरु होती. त्यावेळी फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीसंदर्भात माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

महावितरणची वर्षनिहाय थकबाकी
मार्च 2015 - 16525.3 कोटी
मार्च 2016 - 21059.5 कोटी
मार्च 2017 - 26333 कोटी
मार्च 2018 - 32591.4 कोटी
मार्च 2019 - 41133.8 कोटी
मार्च 2020 - 51146.5 कोटी