सराईत सोनसाखळी चोरांंची टोळी जेरबंद

20 गुन्ह्याची उकल ; 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी

पनवेल : सोन्याची साखळी चोरणार्‍या तब्बल 20 गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 2 ला यश मिळाले आहे. 9 पोलीस ठाण्यांअंतर्गत उघडकीस आलेल्या 20 गुन्ह्यांतील 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 20 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 01 आणि परिमंडळ 02 मधील विविध पोलीस ठाण्याच्या आवारात चैन स्नॅचींग सारखे प्रकार वारंवार घडत असल्याचे समोर येत होते. यापूर्वी फैयाज शेख या गुन्हेगाराला पोलिसांच्या धाडसी पथकाने अटक केली होती. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घडलेल्या सोनसाखळी चोरीचा तपशील संकलीत करुन चोरी करताना वापरलेल्या वाहनांचे प्रकारे, चोरीचे ठिकाण, चोरीची वेळ व वार, वाहनांवर बसलेल्या आरोपींचे वर्णन यांचे वर्गीकरण करुन अभ्यासपर्ण व कौशल्यपुर्ण तांत्रिक तपास करुन सोनसाखळी चोरी करणार्‍या गुन्हेगारांची टोळी निष्पन्न केली. यातील मुख्य आरोपी तन्वीर  उर्फ दिपक व त्याचा साथीदार कलकत्याला पळून जात असताना ओडीसा व झारखंड पोलीसांच्या मदतीने त्यांना धावत्या ट्रेन मधुन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता महत्वाचे धागेदोरे नवी मुंबई गुन्हे शाखा-2 च्या हाती आले. त्यामुळे नवी मुंबई हद्द्तील सोनसाखली चोरीचे गुन्हे उघडकीस आले. नवी मुंबई परिसरातील सोनसाखळी चोरांना पकडून अधिक चौकशी केल्यावर तब्बल 20 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्याकडून 2 मोटार सायकल आणि 38 तोळे सोने असे एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तन्वीर मोहम्मद इब्राहिम शेख ऊर्फ दीपक, अखिल शरीफ खान, तरशरुफ ब्रैद्दुर रहमान शेख, सर्व रा.मानखुर्द, मुंबई, शबनम शब्बीर शेख आणि हरून लाला सय्यद दोघेही रा.पनवेल अशी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गिरिधर गोरे यांच्या पथकातील कर्मचार्‍यांनी केलेल्या या कामगिरीचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.