नवी मुंबईतही वीजबिल होळी आंदोलन

नवी मुंबई ः राज्यात वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा देण्याचा निर्णय न घेतल्याने विरोधी पक्ष भाजपाने आक्रमक भुमिका घेतली आहे. भाजपाकडून सोमवारी, 23 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या पार्श्‍वभुमीवर नवी मुंबईतही भाजपच्यावतीने सकाळपासून विविध ठिकाणी वीज बिल होळी आंदोलन सुरु आहे. 

राज्यातील महाआघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी भाजपा तुर्भे मंडळा तर्फे जोरदार ‘वीजबिल होळी आंदोलन’ करण्यात आले. सकाळी 10:30 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. तुर्भे गाव पोस्ट ऑफिस समोर वीजबिलांची होळी करण्यात आली. या वेळी भाजपा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजप सिवूड मंडळाच्या वतीनेही सेक्टर 50 येथील महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी येथे वीजबिल होळी आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. राज्य सरकारची महावितरण कंपनी लॉकडाऊनमध्ये सरासरी मासिक बिलाच्या नावाखाली लोकांना लुबाडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करुन या राज्य सरकारने जनतेची कशा प्रकारे लूट माजवून ठेवली आहे, हे आम्ही उघड पाडले आहे असे सांगितले. ऐरोली महावितरण कार्यालयावर नवी मुंबई भाजप च्या वतीने वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले.