नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर कोव्हीड चाचणीला सुरुवात

पहिल्या दिवशी 400 हून अधिक नागरिकांची टेस्ट 

नवी मुंबई ः कोव्हीड 19 ची दुसरी लाट येण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. दररोज 4 हजाराहून अधिक चाचण्या करण्याचे लक्ष्य देण्यात आले असून त्यासाठी ए.पी.एम.सी. मार्केट व एम.आय.डी.सी. क्षेत्र या कोव्हीड प्रसाराच्या दृष्टीने जोखमीच्या भागांप्रमाणे सोमवारपासून रेल्वे स्टेशनवरही कोव्हीड 19 टेस्टींग केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.

नवी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येऊ नये व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महानगरपालिकेच्या संबंधित सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. ‘मिशन ब्रेक द चेन - 2’ अधिक जागरुगतेने राबविण्याचे सूचित केले आहे. जलद रुग्ण शोध करण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देत आयुक्तांमार्फत चाचण्यांची संख्या वाढ करावी असे निर्देशित करण्यात आले आहे. दररोज 4 हजाराहून अधिक चाचण्या करण्याचे लक्ष्य देण्यात आले असून त्यासाठी ए.पी.एम.सी. मार्केट व एम.आय.डी.सी. क्षेत्र या कोव्हीड प्रसाराच्या दृष्टीने जोखमीच्या भागांप्रमाणे आजपासून रेल्वे स्टेशनवरही कोव्हीड 19 टेस्टींग केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.

त्यादृष्टीने रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात येणार्‍या स्टेशनवरील निर्गमनाच्या जागांवर महानगरपालिकेची आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून सकाळी 8 ते 1 या वेळेत ही आरोग्य पथके नागरिकांचे कोव्हीड 19 टेस्टींग करणार आहेत. एका आरोग्य तपासणी पथकामध्ये 6 जणांचा समावेश असून सोमवारपासून बेलापूर, नेरुळ, आणि वाशी या तीन रेल्वे स्टेशनवर टेस्टींग केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. या पथकांव्दारे व्यक्तीची लक्षणे पाहून टेस्टींग करण्यात येत असून प्रामुख्याने आर.टी-पी.सी.आर. टेस्टवर भर देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी 400 हून अधिक नागरिकांचे अ‍ॅण्टिजन / आर.टी - पी.सी.आर. टेस्ट करण्यात आलेले आहेत. उर्वरित रेल्वे स्टेशनवरही आरोग्य पथके कार्यान्वित करून कोव्हीड 19 टेस्टींग केले जाणार आहे. त्याचप्रमाणे शाळा सुरु करण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने शिक्षकांचे टेस्टींग सुरु करण्यात आले होते. त्यामध्ये 1195 शिक्षकांच्या आर.टी - पी.सी.आर. टेस्ट करण्यात आल्या असून त्यामधील 17 शिक्षकांच्या टेस्टचे निदान पॉझिटिव्ह आलेले आहे. तथापी आता शाळा 31 डिसेंबर नंतर सुरु होणार असल्याने त्यावेळी पुन्हा टेस्ट केल्या जाणार आहेत. एपीएमसी मार्केटमध्ये असलेली टेस्टींग सेंटर्स अधिक प्रभावीपणे कार्यन्वित करण्यात आली आहेत. तसेच एम.आय.डी.सी. क्षेत्रातही आसपासच्या परिसरातून हजारो कर्मचारी कामगार ये-जा करीत असल्याने एम.आय.डी.सी. मधील कंपन्यांमध्येही टेस्टींग करण्यात येत आहे.