सीसीटीव्ही योजनेला ठेकेदारांची ‘दृष्ट’

पालिकेने काढलेल्या निविदेवर तब्बल 1600 सूचना व हरकतींचा वर्षाव

नवी मुंबई ः शहरामध्ये 158 कोटी रुपये खर्च करुन 1400 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हाती घेतला आहे. या प्रकल्पावरुन प्रतिस्पर्धी ठेकेदारांमध्ये चांगलीच जुंपली असून निविदापुर्व बैठकीमध्ये 1600 सूचना व हरकतींचा वर्षाव संबंधित ठेकेदारांनी केला आहे. आयुक्तांनी या सूचना व हरकतींना उत्तर देण्याची जबाबदारी सल्लागारावर सोपवल्याने या योजनेला ठेकेदारांचीच दृष्ट लागते काय अशी चर्चा सध्या पालिकेत सुुरु आहे. 

शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व गुन्हेगारांवर नजर ठेवण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेेने पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून शहरांमध्ये 1400 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये 650 कॅमेरांची ठिकाणे पोलीसांनी सुचवली असून 800 कॅमेरांची ठिकाणं लोकप्रतिनिधींनी सुचवली आहेत. ठाणे-बेलापुर रोड व सायन-पनवेल महामार्गावर 80 स्पीड कंट्रोल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी 158 कोटी रुपये खर्च येणार असून तो नवी मुंबई महानगरपालिका करणार आहे. शहर अभियंता विभागाने यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया सुरु केली असून ठेकेदारांकडून तांत्रिक व आर्थिक बोली मागविण्यात आली आहे. निविदापुर्व बैठकीमध्ये अनेक ठेकेदारांनी निविदा प्रक्रिया व त्याच्या तांत्रिक अटींवर आपल्या हरकती नोंदविल्या असून त्याची संख्या जवळपास 1600 च्या आसपास आहे. ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणावर सूचना व हरकती घेतल्याने गोंधळलेल्या शहर अभियंता विभागाने ही बाब आयुक्तांच्या नजरेस आणून दिली. आयुक्त बांगर यांनी यासाठी नव्याने नेमलेल्या सल्लागारावर ही जबाबदारी ढकलून निविदा प्रक्रिया सुरुच ठेवण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात आहे. 158 कोटींचेहे कंत्राट मिळवण्यासाठी अनेक ठेकेदार ईच्छुक असून सर्वजण आपले राजकीय वजन त्यासाठी खर्ची घालून आयुक्तांसह शहर अभियंता यांच्यावर दबाव आणत असल्याने पालिका प्रशासनाने त्यापासून दोन हात दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सूचना व हरकती प्राप्त झाल्याने नवी मुंबईकरांच्या सुरक्षेशी निगडीत असलेला हा प्रकल्प लांबणीवर पडतो की काय अशी शंका उपस्थित होत आहे.