रंगचित्रांतून साकारल्या स्वच्छतेच्या संकल्पना

नवी मुंबई ः नवी मुंबईकरांच्या स्वच्छताविषयक कलात्मक जाणीवांना भक्कम व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व भित्तीचित्र, म्युरल्स स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या. कोव्हीडच्या काळातील निरूत्साही वातावरणातून बाहेर पडण्यासाठी ही चित्रकला स्पर्धा उपयोगी ठरल्याची भावना अनेक स्पर्धकांनी व्यक्त केली.

नेरुळ वंडर्स पार्क येथील चित्रकला स्पर्धा आणि वाशी येथील नाला पार्कींग लगतच्या भिंतीवर भित्तीचित्र काढणे स्पर्धेला उत्फुर्त्स प्रतिसाद मिळाला. अतिरिक्त आयुक्त सुजात ढोले आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दोन्ही स्पर्धांच्या ठिकाणी भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला. वंडर्स पार्क नेरूळ येथे संपन्न झालेल्या चित्रकला स्पर्धेच्या ठिकाणी माजी सभागृह नेते रविंद्र इथापे उपस्थित होते. वंडर्स पार्क येथील चित्रकला स्पर्धेत 10 ते 15 वयोगटातील 57 तसेच 15 वर्षावरील 9 स्पर्धकांनी सहभागी होत ’स्वच्छ भारत - स्वच्छ नवी मुंबई’ संकल्पनेवर आधारित आपल्या भावना चित्ररूपांत साकारल्या. 

सेक्टर 16, वाशी येथील नाला पार्कींग लगतच्या भिंतीवर भित्तीचित्र काढणे स्पर्धेमध्ये 20 चित्रकारांनी सहभागी होत स्वच्छतेच्या विविधरंगी भावना भित्तीचित्राच्या माध्यमातून प्रदर्शित केल्या. स्वच्छतेत अग्रणी असलेल्या नवी मुंबई शहराचा नावलौकिक उंचविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हेच जणू या चित्रकारांनी आपल्या भित्तीचित्रातून स्पष्ट केले.   

नागरिकांच्या मनातील स्वच्छतेची संकल्पना साकारण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्राशी संबंधित या दोन्ही स्पर्धा कोव्हीडच्या काळातही नागरिकांचे अंगभूत कलागुणांना मुक्त व्यसपीठ मिळवून देणार्‍या ठरल्या तसेच यामधून नागरिकांच्या मनातील स्वच्छ नवी मुंबईचे चित्रदर्शनही यामधून घडले. स्पर्धेच्या आयोजन कार्यात धनश्री देसाई आणि रोहित शास्त्री यांचे महत्वाचे योगदान लाभले.