एक हजार गरजूंना घोंगडीचे वाटप

सामाजिक जाणीवेतून भूपेश गुप्ता यांची मदत  

नवी मुंबई : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब, बेघर व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आल्याने या गरीब वर्गातील सुमारे अडीच हजार नागरिकांना गत चार महिने दररोज अन्न पाण्याची सोय उपलब्ध करुन देणारे डीव्हॉईस एसएसव्ही केबलचे संचालक तथा समाजसेवक भूपेश गुप्ता यांनी नुकत्याच सुरु झालेल्या थंडीमुळे फुटपाथवर व उड्डाणपुलाखाली झोपणाऱया एक हजार गरीबांना घोंगडीचे (ब्लॅन्केट) वाटप करुन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. गत दहा वर्षांपासून ते गरीब, गरजूंना घोंगडीचे वाटप करत आहेत.  

नवी मुंबई पोलिस विभाग तसेच महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी उद्भवणाऱया आपत्तीप्रसंगी गरीब, गरजूंना मदत करण्याकरिता केलेल्या आवाहनाला समाजसेवक भूपेश गुप्ता हे नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देतात. करोनाच्या आपत्तीतही त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोलिस व महापालिका प्रशासनाने त्यांचे आभार व्यक्त केले होते. याशिवाय  स्वत विविध सामाजिक उपक्रमाचे  आयोजन करुन ते समाजातील गरीब व दुर्लक्षीत घटकाला नेहमीच मदतीचा हात देत आले आहेत.  

आपण ज्या समाजात वावरतो, त्या समाजाप्रती आपले काही देणे आहे या भावनेतून जितके जमेल तितके समाजकार्य करण्याचा आपला प्रयास असतो असे भूपेश गुप्ता यांनी सांगितले. या मागे आपला काहीच स्वार्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.