वाशी खाडीवरील तिसर्‍या पुलाचे काम सुरु

एमएसआरडीसीच्या आदेशानुसार बांधकामाला सुरुवात

नवी मुंबई : वाशी खाडीवरील तिसरा पुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून एमएसआरडीसीच्या आदेशानुसार या पुलाच्या उभारणीस सुरुवात करण्यात आली आहे. या पुलाच्या उभारणीसाठी 775 कोटी रुपये अपेक्षित असून कंत्राटदार म्हणून एल अ‍ॅण्ड टी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईच्या प्रवेशद्वारावर होणारी वाहतुक कोंडी फोडण्यासाठी वाशी खाडीवर तिसरा पुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र गेली अनेक वर्ष हा पुल नियोजित होता. प्रत्यक्ष कामात अनेक अडथळे येत असल्याने त्याचे काम रखडले होते. सुरुवातीला कांदळवनाचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. या पुलामुळे सुमारे दीड हेक्टरवरील कांदळवन नष्ट होणार असल्याने पुलासाठी परवानगी मिळत नव्हती. तेवढेच कांदळवन दुसर्‍या ठिकाणी लावण्याच्या अटीवर वन विभागाने रस्ते विकास महामंडळाला परवानगी दिली. त्यानंतर मार्गदर्शक सूचनांसाठी हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने 19 डिसेंबर रोजी परवानगी दिली होती. त्यानंतर कांदळवन लागवडीसाठी बोरीवली एरंगल येथे वन विभागाची जागा हस्तांतरित झाल्यानंतर या पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला. पुलाच्या निर्मितीसाठी एमएसआरडीसीने कंबर कसली आहे. दोन भागांत हा तिसरा खाडीपूल उभारण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या दुसर्‍या पुलाच्या रेल्वे पुलाकडील दिशेला एक आणि जुन्या खाडीपुलाकडील पहिल्या बाजूला एक असे तीन पदरी दोन पूल बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही पुलांची लांबी 1837 मीटर तर रुंदी 12.70 मीटर इतकी असणार आहे. नोव्हेंबर 2023 पर्यंत हे पूल बांधून तयार करण्याचा निर्धार रस्ते विकास महामंडळाने केला आहे. या पुलामुळे वाहतूककोंडीतून कायमची सुटका होणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे. एल अँड टी कंपनीने यासाठीची सुरक्षा अनामत रक्कम नुकतीच भरल्यानंतर रस्ते विकास महामंडळाकडून पुलाच्या कामाचे आदेश दिले आहेत. या कामाची मुदत नोव्हेंबर 2023 पर्यंत असून त्यानंतर या तिसर्‍या खाडी पुलावरील वाहतूक सुरू होणार आहे. या पुलाच्या उभारणीसाठी 775 कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले आहेत. नोव्हेंबर 2023 पर्यंत पूल बांधून पूर्ण होईल, असा विश्वास एमएसआरडीसीने व्यक्त केला आहे. या पुलामुळे सध्याच्या खाडी पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.