चांदण्याची रात

मीरा के बोल

ह्या मंद चांदण्या अलगद
अवतरल्या हरीच्या अंगणी
गडद काळोखात चाले खेळ असा
कान्हा सखा अन झाल्या त्या साजणी

बासुरीच्या सुराने त्याच्या
मोहरली ती तार्‍यांची रात
सारेच बसले हरीच्या बाजुस
कोणी ही दिसेना आकाशात

त्या सुरेल मंतरलेल्या राती
किती ते तेज हरी मुखी
चंद्र ही विचारे येउनी
गुपीत ह्या सार्‍याचे त्याच्या कानी

चांदण्याची ही मैफिल
कान्हा त्यात शोभूनी दिसे
अवती भवती त्याच्या
जणू मखर तार्‍यांचे असे ...

हरपुनी गेले भान सार्‍यांचे
चोर पावलाने पहाट आली
चंद्र तार्‍यांची आता
निघायची घटीका आली

जीव जडला हरीवर पुन्हा
सोडुन जाता येईना
जड मनाने त्यास निरोप दिला
नभी परतल्या चांदण्या पुन्हा...


- मिरा पितळे