माजी सैनिकांना मालमत्ताकरात सूट

पालिका राबविणार मा. बाळासाहेब ठाकरे मालमत्ताकर माफी योजना 

नवी मुंबई ः भारत देशासाठी प्राणाची बाजी लावून आपले सैनिक निस्वार्थीपणे देशाची सेवा करीत असतात. अशा सैनिकांच्या देशसेवा कार्याचा यथोचित सन्मान राखण्याच्या दृष्टीने तसेच माजी सैनिकांचे मनोबल उंचावण्याकरिता 9 सप्टेंबर 2020 रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील शासन निर्णयानुसार राज्यातील नागरी स्थानिक संस्थांमधील माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याकरिता मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना राबविण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माजी सैनिकांकरिता मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कर माफीस पात्र असणार्‍या व्यक्तींना त्यांच्या मालमत्तेचा मालमत्ता कर माफ करणेविषयी संबंधित विभाग कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकार्‍याचे प्रमाणपत्र व मालमत्ता कर देयक सादर करणे आवश्यक असेल. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मालमत्ता करातून सूट देणेबाबतची कार्यवाही करण्यात येईल. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माजी सैनिकांनी याची नोंद घ्यावी व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.