इमारतीचा स्लॅब कोसळून पाच जण जखमी

नवी मुंबई : कोपरखैरणे येथील एका जुन्या इमारतीत दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावरील छत पहिल्या मजल्यावर कोसळून पाच जण जखमी झाले आहेत. यात एका गरोदर महिलेचाही समावेश असून ती गंभीर आहे. मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली. ही इमारत राहण्यायोग्य नसतानाही अनेकजण इमारतीत राहत होते.

कोपरखैरणे सेक्टर 19 बी येथे ही सिल्वर सॅण्ड इमारत आहे. चार माळयांची ही इमारत 2007 मध्ये बांधण्यात आली होती. इमारतीत 16 सदनिका असून 301, 201, आणि 101 क्रमांकाच्या सदनिकेतील छत पडण्याची घटना घडली.या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील सदनिका क्रमांक 301 चे छत दुसर्‍या मजल्यावरील सदनिका क्रमांन 201 मध्ये तर दुसर्‍या मजल्यावरील छत पहिल्या मजल्यावरील सदनिका क्रमांक 101 मध्ये कोसळले. हा प्रकार शयनगृहात घडला. दुपारीची वेळ असल्याने त्या ठिकाणी कोणी झोपलेले नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत नंदलाल त्र्यंबके, अनिता त्र्यंबके, प्रशांत जाधव, मणिंदर ठाकूर आणि प्रीती झा हे जखमी झाले आहेत. तिसर्‍या माळ्यावरील अनिता त्र्यंबके यांना अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. यातील एक महिला गरोदर होती. ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इमारतीची प्राथमिक तपासणी केली असता पायी चालले तरी कंप होतो. इमारतीच्या पिलरला तडे गेले असून सदर इमारतीची संरचना तपासणी अद्याप झालेली नाही. ही इमारत राहण्यायोग्य नसूक याबाबत विभाग कार्यालयाला कळविण्यात येईल अशी माहिती अगीशमन विभागाचे सहाय्यक अधिकारी एकनाथ पवार यांनी दिली.