ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी साकडे

इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन

नवी मुंबई : ठोक मानधनावर वर्षानुवर्षे नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणार्‍या कर्मचार्‍यांची सेवा कायम व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणिस संतोष शेट्टी व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी निवेदनातून साकडे घातले आहे.

महापालिका प्रशासनात ठोक मानधनावर काम करणार्‍या कामगारांची सेवा कायम व्हावी यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत हे महापालिका प्रशासनापासून ते मंत्रालयापर्यत सतत प्रयत्न करत आहेत. ठोक मानधनावरील कामगारांची सेवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम झाल्याचे कामगार नेते रवींद्र सावंत यांनी निवेदनातून व प्रत्यक्ष भेटीगाठीतून महापालिका प्रशासनाच्या व राज्य सरकारच्या निदर्शनासही आणून दिलेले आहे. महापालिका प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी नुकताच राज्य सरकारकडेही पाठविला आहे. राज्य सरकारकडून या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी रवींद्र सावंत यांनी मंत्र्यांच्या तसेच महाविकास आघाडीतील नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेवून, याबाबतचा पाठपुरावा कायम ठेवला आहे. मंगळवारी मंत्रालयात जावून नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून या प्रस्तावाला राज्य सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली. यावेळी महापालिकेतील कामगारही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

खासदार राजन विचारेंनाही निवेदन

स्थानिक शिवसेना खासदार राजन विचारे यांनी ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करावेत यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी त्यांची भेट घेवून निवेदनातून साकडे घातले आहे.