उद्यानांची सुरक्षा वार्‍यावर

समस्या सोडविण्याची माजी नगरसेवक रतन मांडवेंची मागणी 

नवी मुबई : नेरूळ सेक्टर 8 मधील पालिकेच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यान व कै. साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यान समस्येंच्या गर्तेत अडकले आहे. सुरक्षेखातर येथे सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षम नेमुन या उद्यानांतील इतर समस्या सोडविण्याची मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

प्रभाग क्र. 87 नेरूळ, सेक्टर 8 मध्ये महापालिकेची छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यान व कै. साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यान ही दोन उद्याने आहेत. येथे सुरक्षारक्षक अभावी रात्रीच्या वेळी मद्यपि व गर्दुल्यांचा वावर वाढला आहे. याचा त्रास स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहे. या उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीसाीठी पालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. मात्र तेथील सुरक्षा वार्‍यावर असल्याचे पाहायला मिळत आहे.कै. साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यानात महापालिका प्रशासनाने सुरक्षा रक्षकच दिलेला नाही. तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यानात केवळ सांयकाळी 7 वाजेपर्यतच सुरक्षा रक्षक असतात. उद्यानातील माहिती फलकावर उद्यान रात्री 9 वाजता बंद होत असल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्ष रात्रीच्या वेळी ही उद्याने बंदच केली जात नसल्याने रात्री या ठिकाणी समाजविघातक शक्तींचा खुलेआमपणे वावर होत असतो. सुरक्षा रक्षक नसल्याने येथे गर्दुल्यांचा वावर वाढल्याने रात्रीच्यावेळी येथे अनुुचितप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लॉकडाऊनमुळे उद्याने गेली सात महिने बंद असल्याने तेथील ओपन जीमच्या साधनांचीही पालिका प्रशासनाकडून पाहणी करून डागडूजी होणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्यानांतील समस्या सोडविण्याची मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच येथे सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे असून दोन्ही उद्यानात पालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर सीसीटीव्ही बसविणे आवश्यक असल्याचे मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे. उद्यानात सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, वेळेवर उद्यान बंद करणे, ओपन जीमच्या साहीत्याची तपासणी याबाबत लवकरात लवकर कार्यवाहीची मागणी त्यांनी केली आहे.