कोरोनाची लस काही आठवड्यात तयार होईल

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर ते म्हणाले, पुढच्या काही आठवड्यात कोरोनाची लस तयार होईल, असा विश्‍वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शास्त्रज्ञांनी लशीला हिरवा कंदील दिल्यानंतर लगेच देशात लसीकरणाला सुरुवात होईल. यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिलं जाईल.

लशीच्या किंमतीविषयी केंद्र सरकार राज्यांशी चर्चा करत आहे. यासंदर्भातला निर्णय सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन घेतला जाईल, असंही मोदींनी म्हटलं आहे. आपले शास्त्रज्ञ कोरोनावरची लस तयार करण्यात सक्षम आहेत. भारताच्या स्वस्त आणि सुरक्षित लशीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

येत्या काही आठवड्यात लस तयार होईल, याबाबत तज्ज्ञांना विश्‍वास आहे. आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीत काम करणारे कर्मचारी तसंच गंभीर आजारांनी ग्रस्त वयोवृद्ध व्यक्तींना ही लस देण्यास प्राधान्य दिलं जाईल. केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे लसीच्या पुरवठ्याचं काम करतील. इतर देशांच्या तुलनेत जास्त चांगल्या पद्धतीने हे काम करण्यात येईल. आपल्याकडे लसीकरणासाठीची मोठी आणि अनुभवी यंत्रणा आहे. आपण त्यांचा वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.