लॉकडाऊनमध्ये कंपन्यात चोरी करणारी टोळी जेरबंद

अडीच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

नवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात तुर्भे एमआयडीसीतील बंद कंपन्यांमध्ये घुसून कंपनीतील लाखो रुपये किंमतीच्या मालाची चोरी करणार्‍या टोळीला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने केलेले दोन चोरीचे गुन्हे उघडकिस आले असून या दोन्ही गुह्यातील सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीचा माल विकत घेणार्‍या भंगार विक्रेत्याला अटक करुन या टोळीने सदर गुह्यासाठी वापरलेली महेंद्रा बलेरो पीकअप जीप, टेम्पो व रिक्षा हि वाहने देखील जप्त केली आहेत.  

लॉकडाऊनमुळे तुर्भे एमआयडीसीतील बहुतेक कंपन्या बंद असल्याची संधी साधुन काही चोरट्यांनी गत सप्टेंबर महिन्यामध्ये पावणे एमआयडीसीतील वेस्ट कॉस्ट पॉलीकेम प्रा.लि. या कंपनीमध्ये प्रवेश करुन सदर कंपनीतील सुमारे सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे ईपीडीएम रबरच्या एकुण 52 गोण्याचा माल चोरुन नेला होता. या बाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने कंपनीत घुसून चोर्‍या करणार्‍या टोळ्यांचा तांत्रिक पद्धतीने शोध घेण्यास सुरुवात केली होती.  या तपासादरम्यान,पोलिसांना तुर्भे एमआयडीसी परिसरात राहणार्‍या चोरट्यांची  माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी आशीष अशोक यादव (22), इबरार बशीर अहमद खान उर्फ लंबु (21), सनी राजबली सिंग (24) आणि अनिल रामविलास यादव (26) या चौघांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करुन सदर गुह्यातील सुमारे दिड लाख रुपये किंमतीचा ईपीडीएम रबराच्या 34 गोण्यांचा माल हस्तगत केला. तसेच या गुह्यासाठी त्यांनी वापरलेली महेंद्रा बलेरो पिकअप जीप सुद्धा जप्त केली.  

या चौघांच्या चौकशीदरम्यान, यातील तिघा चोरट्यांनी   एप्रिल महिन्यामध्ये पावणे एमआयडीसीतील लाईफ लाईन टेक्नॉलॉजीस कंपनीचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणावरुन 2 लाख 16 हजार रुपये किंमतीचे ऍल्युमिनियमचे तयार केलेले फ्रेम व ऍल्य्मिनीयमच्या पावडरचे कोटींग केलेल्या पट्टया चोरुन नेल्याची कबुली दिली.