शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्‍न जैसे थे

दुर्घटनांमध्ये वाढ ; स्ट्रक्चरल ऑडीटकडे पाठ

नवी मुंबई : कोपरखैरणे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाने गत ऑक्टोबर महिन्यातच शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करुन 30 वर्षांहून जुन्या इमारतींचे संरचना परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडीट) करून घेण्यासंदर्भात सूचित केले आहे. अन्यथा 25 हजार रुपये दंड ठोठावण्याचा इशारा देखील दिला आहे. मात्र, त्यानंतर देखील नवी मुंबई शहरातील अनेक इमारतींनी स्ट्रक्चरल ऑडीट केले नसल्याचे या दुर्घटनेवरून दिसून येत आहे.  

मंगळवारी झालेल्या दुर्घटनेत कोपरखैरणेतील सेक्टर-19बी मधील सिल्वर सॅड या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने केलेल्या तपासणीत सदर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले नसल्याचे आढळून आले आहे.  सिल्वर सॅड सारख्याच अनेक धोकादायक इमारती नवी मुंबईत आहेत. महापालिका केवळ धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यात धन्यता मानत आहे. जर रहिवाशी धोकादायक इमारत सोडण्यास तयार नसतील तर प्रशासनाने या इमारती रिकाम्या करण्यासाठी कठोर भुमीका घेणे गरजेचे होते. 2020-2021 या वर्षासाठी महापालिकेने धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून सिडको विकसीत नोड्स आणि येथील मुळ गावामध्ये नागरिकांना राहण्यायोग्य नसलेल्या इमारतींची यादी तयार केली आहे. यात 457 धोकादायक इमारती म्हणून घोषित केल्या आहेत.