गवळीदेव आणि ऐरोली रेल्वे स्थानक परिसर झाला स्वच्छ

 नवी मुंबई ः गत आठवड्यात ग्रीन होप, संत निरंकारी मंडळ, मध्य रेल्वे मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्या अंतर्गत पर्यटनस्थळ गवळीदेव येथे ग्रीन होप संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहिम तसेच ऐरोली रेल्वे स्थानक परिसरात रविवारी स्वच्छता व वृक्षारोपण मोहिम पार पडली. 

भारत स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत 1 डिसेंबर रोजी आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरखैरणे येथे स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला होता. नवी मुंबईतील डोंगराळ भाग, खाडीकिनारा, रेल्वे स्थानके अशा सर्वच भागात 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2020 या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. रविवारी गवळीदेव व ऐरोली रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक संस्था, एनएनएस, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. 

गवळीदेव येथील स्वच्छता करताना मोठया प्रमाणावर प्लास्टिक, काचेच्या बाटल्या व इतर कचरा उचलण्यात आला. अशी माहिती देत माजी आमदार संदीप नाईक यांनी निसर्गाला हानी होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन केले. ते म्हणाले, कोरोना काळातील लॉकडाउनमुळे पर्यावरणपुरक पिशव्या सहज उपलब्ध होत नव्हत्या परिणामी प्लास्टिक बॅगचा वापर वाढला. परंतु आता अनलॉक झाल्यामुळे नागरिकांनी प्लास्टिक बॅगचा वापर थांबवावा.स्वच्छता हा एक दिवसाचा विषय नसून सातत्याने करण्याचे काम आहे. आपण सर्वांनी मिळून निश्‍चय केला तर स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई पहिला क्रमांक नक्की पटकावले, असा विश्वास व्यक्त करतानाच केवळ नंबर मिळविण्यासाठी महत्वाची नाही तर खर्‍या अर्थाने शहरात स्वच्छता नियमितपणे राखली पाहिजे, असे मतही त्यांनी मांडले. नजिकच्या काळात प्लास्टिकमुक्त नवी मुंबई मोहिमेला चालना देण्याचा माजी आमदार संदीप नाईक यांचा मनोदय आहे. या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी नवी मुंबईकरांना केले आहे.