अपघात विमा योजनेत 1 एप्रिलपासून बदल

2.5 लाख ते 1 कोटीपर्यंत मिळणार लाभ ; 18 डिसेंबरपर्यंत सूचना आणि सुधारणांसाठी वेळ

नवी दिल्ली : विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने(आयआरडीएआय) नवी वैयक्तिक अपघात विमा योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील वर्षातील 1 एप्रिलपासून नवी योजना लागू होणार आहेत.  या योजनेतील नियम, अटी आणि फायदे सर्व कंपन्या आणि ग्राहकांसाठी सारखेच असणार आहेत. प्रस्तावित योजनेनुसार अपघात विम्याचा लाभ 2.5 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत असेल. 

आयआरडीएआयने देशातील सर्वसाधारण आणि आरोग्य विमा कंपन्यांना एक वैयक्तिक अपघात विमा योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. आयआरडीएआयचा स्टँडर्ड अपघात विमा योजना तयार करण्यामागे अपघात विम्यावरील लोकांचा विश्वास वाढवणे हा उद्देश आहे. विमाधारक व्यक्तीला मृत्यू, कायमचे अपंगत्व, आंशिक अपंगत्व आल्यास या अपघात विमा योजनेद्वारे लाभ मिळणार आहे. नव्या अपघात विमा योजनेद्वारे विमा घेतलेल्या व्यक्तीला रुगणालयात दाखल होण्याचा खर्च दिला जाणार आहे. विमाधारकाचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास त्याच्या दोन मुलांच्या शिक्षणाचाही खर्च केला जाणार आहे. आयआरडीएआयने प्रस्तावित अपघात विमा योजनेवर 18 डिसेंबरपर्यंत सूचना आणि सुधारणांसाठी वेळ दिला आहे. या काळात आयआरडीएकडे याबाबत सूचना नोंदवाव्या लागणार आहेत. 2021 च्या एप्रिल महिन्यापासून आयआरडीएआयने स्टँडर्ड अपघात विमा योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

नव्या योजनेच्या मसुद्यामध्ये बाजारात वेगवेगळ्या अपघात विमा योजना उपलब्ध असून त्यामुळे ग्राहकांना निवड करताना अडचण निर्माण होते, असं म्हटलं आहे. प्रत्येक कंपन्यांच्या अपघात विमा योजनेची वैशिष्ट्ये वेगळी असल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ होतो. त्यामुळे आयआरडीएआयने सामान्य ग्राहकांसाठी स्टँडर्ड अपघात विमा योजना सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. प्रस्तावित योजनेनुसार अपघात विम्यातील कमीत कमी संरक्षण 2.5 लाख तर जास्तीतल संरक्षण 1 कोटी पर्यंत असेल.