कोटीच्या कोटी ‘उद्याने’

सन गार्डनच्या नावाखाली कोट्यावधीची निविदा

नवी मुंबई ः उद्यान विभागाने काम न करता आठ कोटी रुपये ठेकेदाराला दिल्याच्या प्रकरणावरील धुरळा बसत नाही तोच सीवूड्स सेक्टर 40 मधील सुस्थितीत असणार्‍या उद्यानावर सन गार्डन विकसीत करण्याच्या बहाण्याने पुन्हा 2 कोटी खर्च करण्याची निविदा प्रक्रिया पालिकेने सुरु केली आहे. पालिकेने परिमंडळ 1 व 2 मधील उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी 35 कोटी रुपयांचे काम दिले असताना पुन्हा ही उद्यान विभागाची कोटींची उड्डाने कशासाठी? असा सवाल नवी मुंबईकांनी उपस्थित केला आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेने उद्यान विभागाने परिमंडळ 1 व 2 मधील उद्यान देखभाल दुरुस्तीचे कंत्राट 35 कोटी रुपयांना दिले होते. काम न करताच संबंधित ठेकेदाराला 8 कोटी रुपयांचे देयक अदा केल्याने आयुक्त बांगर यांनी संबंधित कंत्राट रद्द करुन पालिकेच्या तीन अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. ते एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी आठ कोटी रुपयांचा दंड  संबंधित ठेकेदाराला बजावला आहे. सीवूड्स सेक्टर 40 येथील सुस्थितीत असलेल्या उद्यानाचे सन गार्डनमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय पालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे. 192 लाखांची निविदा प्रक्रिया उद्यान विभालाने राबवली असून निविदा सादर करण्यासाठी 15 डिसेंबर तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. या निविदा जाहीरातीनंतर सदर उद्यानांची पाहणी केली असता उद्यान सुस्थितीत असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. वरील प्रकरण सध्या गाजत असताना उद्यान विभागातील अधिकार्‍यांच्या मात्र हिम्मतीला दाद देऊ तेवढी थोडीच आहे. पालिकेच्या उद्यान विभागाचे वर्षाचे 70 कोटींचे बजेट असून येन-केन प्रकारे खर्च करण्याचा या विभागाचा हातखंडा आहे. त्यामुळे वृक्षारोपन, लाल मातीचा भराव आणि देखभाल दुरुस्तीवर जनतेच्या पैशाची उधळण दरवर्षी करण्यात येते. उद्यान विभागाचे विशेष लेखापरिक्षण केल्यास अनेक घोटाळे बाहेर येतील अशी चर्चा सध्या महापालिकेत आहे. त्यामुळे आयुक्त बांगर यांनी उद्यान विभागाच्या कारभाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज नवी मुंबईकर व्यक्त करत आहेत.