राज्य सरकारने भरती प्रक्रिया थांबवावी

मुंबई ः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी विविध पदांवर निवड झालेल्या उमेदवारांच्या पदस्थापनेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकारने भरती प्रक्रिया थांबविण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेतील या उमेदवारांनी आझाद मैदानात उपोषण आंदोलन छेडले आहे.

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून (एसईबीसी) तलाठी, महावितरण, मेट्रो, राज्यसेवा अशा विविध विभागात उमेदवार यशस्वी झाले होते. नियुक्तीच्या प्रतीक्षेतील या उमेदवारांची सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, करोना काळात अंतिम नियुक्ती आदेश रखडले. ही दिरंगाई राज्य सरकारकडून झालेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे या पेचातून मार्ग निघेपर्यंत सर्व नियुक्त्या थांबवाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. सरकारने मराठा आरक्षणातील उमेदवारांना तात्पुरते वगळून इतर घटकांच्या नियुक्ती केल्यास सेवाज्येष्ठतेचा प्रश्न निर्माण होतो, असा दावाही आंदोलकांकडून केला जात आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येणार्‍या मराठा आंदोलकांना अडविले गेले. मुंबईच्या सीमेवर पोलिसांनी तपासणी मोहीम हाती घेतली होती. काही आंदोलकांच्या गाड्या पकडण्यात आल्या. मात्र, त्यातूनही लोकलसह अन्य मार्गांनी आंदोलक आझाद मैदानात पोहोचल्याचे मराठा आंदोलकांच्या समन्वयकांनी सांगितले.