कोरोना उपचार एकाच केंद्रावर होणार

नवी मुंबई : सध्या नवी मुंबईत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. दिवसाला शंभरच्या खाली कोरोना रुग्ण सापडत असून शहरातील एकूण खाटांपैकी 80 टक्के खाटा रिकाम्या आहेत. करोनामुक्तीचा दरही 95 टक्के इतका आहेत. त्यामुळे आता इतर चार काळजी केंद्रेही बंद करण्यात येणार असून सिडको प्रदर्शनी केंद्र व डॉ.डी वाय पाटील रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

 कोरोनाकाळात पालिकेने शहरात 13 करोना काळजी केंद्रांसह पालिकेचे वाशी येथील रुग्णालय करोनासाठी राखीव ठेवले होते. मात्र आता रुग्णसंख्या कमी झाली असून 13 पैकी 9 काळजी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. तर वाशी येथील पालिकेचे रुग्णालय सामान्य रुग्णालय केले आहे. सोमवारी पालिका आयुक्तांना शहरातील करोना परिस्थितीचा बैठकीत आढावा घेतला. यात आणखी दोन केंद्रे बंद करण्याबाबत निर्णय घेतला असून एकाच ठिकाणी उपचारांबाबत नियोजन केले आहे. सद्य:स्थितीत लेवा पाटीदार सभागृह ऐरोली व निर्यात भवन तुर्भे येथे कमी करोना रुग्ण आहेत. तर वाशी प्रदर्शनी केंद्र व राधास्वामी सत्संग भवन तुर्भे या ठिकाणी काही प्रमाणात रुग्ण आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी कमी उपचाराधीन रुग्ण आहेत त्या ठिकाणचे केंद्र आढावा घेऊन बंद करण्यात येणार आहेत. शहरातील 13 काळजी केंद्रांपैकी आतापर्यंत 9 केंद्रांत नवीन रुग्णांना प्रवेश देणं बंद केले आहे. आणखी दोन केंद्रांत प्रवेश बंद होणार आहेत. शहरात करोनाबाधितांची संख्या आतापर्यंत 49 हजार 653 झाली आहे तर 1015 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही फक्त एक हजारापर्यंत खाली आली आहे. पालिकेतील बंद करण्यात आलेल्या 9 काळजी केंद्रांतील आरोग्यसेवा देणार्‍यांना शहरातील नेरुळ व ऐरली येथील रुग्णालयात अधिक उपचारसुविधा देण्यासाठी हलविण्यात आले आहे. त्यामुळे वाशी येथील एकाच केंद्रावर करोना उपचार करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.