खाजगीकरणाविरोधात जेएनपीटी कामगारांचे आंदोलन

पनवेल : केंद्र सरकारने जेएनपीटी बंदराचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णय विरोधात बुधवारी जेएनपीटी कामगारांनी जेएनपीटी प्रशासन भवनावर ‘पीपीपी हटवा जेएनपीटी कंटेनर टर्मिनल बचाव’ चा नारा देत प्रचंड मोर्चा काढला होता. पोलिसांनी हा मोर्चा कासव चौकात अडविल्यावर त्याचे सभेत रूपांतर झाले. जेएनपीटी कामगार एकता संघटना, न्हावा शेवा बंदर कामगार संघटना आणि जेएनपीटी वर्कर्स युनियन या संघटनांच्या माध्यमातून आयोजित या मोर्चात शेकडो कामगार सहभागी झाले होते. या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि रायगड चे खासदार सुनिल तटकरे आवर्जून उपस्थित होते.

बंदर हे शेतकर्‍याच्या त्यागातून व हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झाले आहे. आपल्या सर्वस्वाची होळी करणार्‍या प्रकल्पग्रस्त जनतेच्या समस्या जैसे थे ठेऊन जेएनपीटी बंदराचे खाजगीकरण करून जेएनपीटी बंदरातील कर्मचार्‍यांना संकटात टाकणार्‍या केंद्रसरकार विरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला आहे. देशातील सर्व बंदराच्या उत्पन्नापैकी केंद्र सरकारला 35 टक्के उत्पन्न एका जेएनपीटी बंदरातून मिळत असताना काही भांडवलदारांच्या फायद्यासाठी केंद्र सरकार जेएनपीटी बंदराचे खाजगीकरण करीत असेल तर ते शिवसेना कधीही सहन करणार नसल्याचे खासदार बारणे यांनी स्पष्ट केले. या खाजगीकरण प्रश्नाबाबत केंद्रीय बंदर विकास मंत्री मनसुख मालवीय यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केल्यावर जेएनपीटी बंदराच्या खाजगिकरणाचा कसलाही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आता बंदरच विकायला काढल्याने शिवसेना त्याला प्रखर विरोध करेल असे सांगून प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा बारणे यांनी यावेळी दिला. यावेळी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी केंद्र सरकारने शिवरायाच्या भूमीतील भूमीपुत्रांशी वाकडे घेऊ नका असे सांगून आता राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने कुठल्याही कामगारांविरोधी निर्णय घेऊ देणार नसल्याचे ठणकावून सांगितले. तसेच देशाचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जेएनपीटी बंदराच्या पीपीपी धोरणा विरोधात महाविकास आघाडीचे सर्व खासदार केंद्र सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तसेच जेएनपीटी बंदराच्या प्रशासन येथील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, दोन गावांच पुनर्वसन आणि रुग्णालयाचा प्रश्न न सोडविता खाजगीकरणाचा डाव आखत असतील तर दि.बा.पाटलांचा भूमिपुत्र हे कदापी सहन करणार नाही  अशा भूमिपुत्रांच्या मागे या पुढेही आम्ही राहणार आहोत असेही तटकरे यांनी सांगितले. 

यावेळी जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष तथा ट्रस्टी दिनेश पाटील,न्हावा शेवा बंदर कामगार संघटना जनरल सेक्रेटरी तथा ट्रस्टी भुषण पाटील, जेएनपीटी वर्कर्स युनियन जनरल सेक्रेटरी तथा माजी ट्रस्टी रवि पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगारांनी पीपीपी हटवा जेएनपीटी कंटेनर टर्मिनल बचावचा नारा दिला.