...आणि बिबट्याच केला फस्त

बिबट्याची कातडी व नखे हस्तगत ; दोन आरोपींना अटक 

पनवेल : पनवेल तालुक्यातील मोरबे धरणाजवळील जंगल व डोंगराळ भागातील दोन इसमांकडून पोलिसांनी बिबट्यांची दोन कातडी आणि नखे जप्त केली. सदर आरोपींनी मेलेल्या बिबट्याची नखे आणि कातडी काढून त्याचे मासं शिजवून खाल्ल्याचे समोर आले आहे. मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्‍यांनी सापळा लावून या आरोपींना अटक केली आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरु आहे.

मोरबे धरणाजवळील जंगल परिसरात दोन इसमांकडे बिबट्याची कातडी व नखे असल्याची खबर नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सविन टिके, मध्यवर्ती कक्ष, गुन्हेशाखा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंग, डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या आदेशनुसार पोलीस उपाायुक्त प्रविण पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्ष येथील अधिकारी व अंमलदार यांनी मोर्थी धरणाजवळील जंगल व डोंगराळ भागा मध्ये दोन दिवस पाळत ठेवली. डोंगराळ जंगल भागात पायवाटेने पायी चालत त्यांनी एका झोपडीत राहणार्‍या गणपत पालकु लोभी, रा.पालेखुर्द, गणपत राघु वाघ , पालेखुर्द यांना ताब्यात घेऊन झोपडीची झडती घेतली असता त्यांना एका पोत्यात बिबट्याची कातडी आणि नखे आढळून आली. वन विभागाच्या पथकाने ही बिबट्याची कातडी असल्याचे स्पष्ट केले. सदर आरोपींची चौकशी केल्यानंतर साधारण: दिड महिन्यापूर्वी मोर्बी धरणाजवळील जंगलामध्ये एक बिबटया मृत अवस्थेत पडलला होता. त्या बिबटयाला झोपडीजवळ आणुन त्यांनी चाकुच्या सहाय्याने त्याची कातडी सोलून काढली होती. त्यानंतर बिबटयाचे कातडे काढून नखे व जबडा वेगळे केल्यानंतर बिबटयाचे मांस शिजवुन खाल्लेचे सांगितले. त्या बिबटयाची चार नखे आरोपींच्या पालेखुर्द येथील घरातुन हस्तगत करण्यात आलेली आहेत. बिबट्याची उर्वरित नखे, जबडा व इतर अवशेष  याबाबत अधिक तपास चालु असल्याचे पोलीसांनी सांगितले.