उद्यान विभागाला 15 दिवसांचा अल्टिमेटम

उद्यानांची स्थिती सुधारण्याचे आयुक्तांचे निर्देश

नवी मुंबई ः शहराची ओळख ‘उद्यानांचे शहर’ अशीही असून दरम्यानच्या काळात झालेले उद्यान दूरवस्थेचे चित्र बदलणे हे आपल्यापुढील आव्हान असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी उद्यानांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढील 15 दिवसांचे अल्टिमेटम देत संपूर्ण क्षमतेने काम करण्याचे निर्देश उद्यान विभागाच्या विशेष बैठकीप्रसंगी दिले.

उद्यान विभागातील अधिकार्‍यांची वरची फळी काहीशी बदललेली असली तरी प्रत्यक्ष जागेवर काम करणारे उद्यान सहाय्यक व उद्यानांची देखभाल करणारे कामगार तेच असल्यामुळे उद्यानांचे आजचे स्वरूप बदलून त्यात आमुलाग्र सुधारणा करण्यासाठी पुढील 15 दिवस झोकून देऊन काम करावे असे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी उद्यानांचे स्वरूप आपल्या नजरेला समाधानकारक वाटेल अशाप्रकारे काम करावे व कामात 15 दिवसानंतर जराही तडजोड खपवून घेतली जाणार नाही आणि जाणूनबुजून हलगर्जीपणा केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट शब्दात निर्देश दिले. उद्यान विभागाच्या उपआयुक्तांपासून सर्व अधिकार्‍यांनी दररोज वेगवेगळ्या उद्यानांना, हरितपट्ट्यांना, सुशोभित जागांना भेट देऊन तेथील सद्यस्थितीची पाहणी करावी व त्यामध्ये सुधारणा करून घ्याव्यात असेही आयुक्तांनी यावेळी आदेशित केले. उद्यान विषयक कामांमध्ये विशेषत्वाने उद्यानांची दैनंदिन स्वच्छता ठेवणे, नियमित कचरा उचलणे, कम्पोस्ट पीट्स उपयोगात ठेवणे आणि उद्यानांच्या देशभाल दुरूस्तीकडे व्यवस्थित लक्ष देणे तसेच उद्यानांची सुरक्षा राखणे या बाबींबाबत काटेकोर कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. काम करताना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून संपूर्ण सहकार्य मिळेल असे स्पष्ट करीत याकरिता 15 दिवसांची मुदत देत त्यानंतर अचानक कोणत्याही उद्यानाला भेट देऊन त्याची पाहणी करणार असल्याचे सांगितले. या भेटीमध्ये कामात कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसून त्याच ठिकाणी कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत आयुक्तांनी दिले.